रत्नागिरी : तरुणाईची कल्पकता, अभिनयकौशल्य आणि सामाजिक भान यांचा प्रभावी संगम घडवून आणणाऱ्या मानाच्या महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक २०२६ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने दणदणीत यश संपादन केले. ‘उजेड-अंधार’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावत पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. याच महाविद्यालयाच्या ‘दाग अच्छे है’ या एकांकिकेने द्वितीय, तर फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘वारेबुवा’ने तृतीय क्रमांक मिळविला.

महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित या दोन दिवसीय स्पर्धेत रत्नागिरी, चिपळूण, देवरुख, लांजा, देवगड आदी भागांतील तब्बल १५ महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी सामाजिक, कौटुंबिक आणि समकालीन विषयांना आपल्या कल्पकतेची जोड देत एकांकिकांच्या माध्यमातून अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनातील कौशल्याची प्रभावी झलक सादर केली. दोन दिवस नाट्यगृहात रंगलेल्या या कलाविष्कारामुळे तरुणाईच्या उत्साहाने वातावरण अक्षरशः भारावून गेले.

स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा गुरुवारी दि. २७ रोजी उत्साहात पार पडला. या वेळी रत्नागिरीच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, तहसीलदार रामदास म्हात्रे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे झोनल मॅनेजर नितीन सिनकर, ज्येष्ठ रंगकर्मी व लेखक अनिल दांडेकर, डॉ. संजय केतकर, परीक्षक डॉ. संजीवकुमार पाटील, चंद्रशेखर कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, पुण्याचे समन्वयक प्रदीप पाटसकर, सुहास नागरे तसेच कोकण समन्वयक प्रा. डॉ. आनंद आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘उजेड-अंधार’ने पटकावला पुरुषोत्तम करंडक; गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची दणदणीत बाजी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

वैयक्तिक पुरस्कारांमध्येही गोगटे-जोगळेकरचा दबदबा

सांघिक यशासोबतच वैयक्तिक पुरस्कारांमध्येही गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. ‘उजेड-अंधार’चे राज शिंदे यांची सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून निवड झाली. फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘वारेबुवा’साठी स्वानंद शेणई यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक पुरस्कार मिळाला.

‘दाग अच्छे है’मधील तन्वी सावंतदेसाई यांनी सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य, तर ‘उजेड-अंधार’मधील तनिष्का शिरधनकर यांनी सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य पुरस्कार पटकावला. ‘वारेबुवा’मधील शारदा भंडारे यांना अभिनय नैपुण्य अभिनेत्री, तर विशाल सुर्वे यांना अभिनय नैपुण्य अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले.

पाच कलाकारांना अभिनय उत्तेजनार्थ पुरस्कार

उल्लेखनीय अभिनयाची दखल घेत स्पर्धेत पाच कलाकारांना अभिनय उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. स. ह. केळकर महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान, देवगडच्या ‘दशावतार’मधील शिवमणी पाळेकर, आठले-सप्रे-पित्रे वरिष्ठ महाविद्यालय, देवरुखच्या ‘डाईट प्लान’मधील मनाली चव्हाण, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘दाग अच्छे है’मधील तन्मय डांगे, डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूणच्या ‘बायोमॅट्रिक’मधील पृथ्वी मोहिते आणि फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘सदाफुली’मधील प्रार्थना सावंत यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी विशेष रंगभूमी शिबिर

पुरुषोत्तम करंडक ही तरुणाईच्या कल्पनाशक्तीला, अभिनयकौशल्याला आणि सामाजिक जाणिवेला व्यासपीठ देणारी प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांकडून सामाजिक व समकालीन विषय प्रभावीपणे एकांकिकांच्या माध्यमातून मांडले जातात. रत्नागिरी नगरपालिकेतर्फे या स्पर्धेला यापुढेही सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली.

दरवर्षी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी सावरकर नाट्यगृह मोफत उपलब्ध करून देण्यासोबतच स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी अभिनय, दिग्दर्शन आणि रंगभूमीविषयक मार्गदर्शनाचे विशेष शिबिर आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रंगभूमीच्या क्षेत्रात आपली कला अधिक प्रभावीपणे विकसित करण्याची आणि नव्या संधींची दारे खुली करण्याची संधी मिळणार आहे.