अलिबाग – गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. पक्षाने उभे केलेल्या १८ उमेदवारांचा पराभव झाला. पाच दशकांहून अधिक काळ ताब्यात असलेल्या अलिबाग पंचायत समितीवरील सत्ता राखण्यातही पक्षाला अपयश आले.
रायगड जिल्हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जिल्ह्यांतून पाच आमदार विधानसभेवर निवडून जात होते. लोकसभेवरही पक्षाचे उमेदवार विजयी होत होते. रायगड जिल्हा परिषदेवर काही अपवाद सोडले तर पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असायचे पण गेल्या काही वार्षांपासून पक्षाच्या जनाधाराला ओहोटी लागली आहे. पक्षाचे जुनेजाणते नेते पक्षाला सोडून गेल्याने शेकापचे जिल्ह्यातील अस्तित्वच धोक्यात आले आहे.
२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापचे २३ उमेदवार निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून पाच वर्ष पक्षाने सत्ताही उपभोगली होती. पण या निवडणुकीत पक्षाला २३ उमेदवारही देता आले नाही. १८ उमेदवारच पक्षाने उभे केले होते. या सर्वांचा निवडणूकीत मानहानीकारक पराभव झाला. शेकापचा पनवेल, उरण, पेण पाठोपाठ अलिबागचा बालेकिल्लाही ढासळला, शेकापला अलिबागमध्ये जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी एकही जागा जिंकता आली नाही. पंचायत समितीतही पक्षाचा दारूण पराभव झाला. १४ पैकी एकाच जागेवर शेकापचा उमेदवार विजयी झाला. चेँढरे आणि आक्षी मध्ये पक्षाच्या उमेदवारांना अल्पमतांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अलिबागच्या पंचायत समितीवर असलेली सत्ता शेकापला गमवावी लागली आहे. १४ पैकी १२ जागा जिंकत शिवसेना शिंदे गटाने पंचायत समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर बिगर शेकाप सत्ता आली आहे. हा पराभव शेकापच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणारा आहे.
गेल्या पाच वर्षात पक्षातील अनेक मोठे नेते पक्षाला सोडून गेले आहेत. पेणमध्ये धैर्यशील पाटील निलिमा पाटील पक्षाला सोडून गेले. अलिबाग मध्ये पाटील कुटुंबातच फूट पडली. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार सुभाष पाटील आणि जिल्हा परिषदेची धुरा सांभाळणारा भाचा आस्वाद पाटील यांनी पक्षाची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीनंतर पनवेल मध्ये जे एम म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे पक्षाला सोडून गेले. दक्षिण रायगडात पक्षाचे अस्तित्व राखून असलेले अस्लम राऊतही जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत दाखल झाले. पक्षांतर्गत एकाधिकारशाही आणि पक्षाला लागलेली गळती रोखण्यात आलेल्या अपयश यामुळे पक्षाची वाताहत झाली. पक्षाला उमेदवार मिळवताना नाही कसरत करावी लागली. तरुणांना संधी देण्याच्या नावाखाली आयत्यावेळी कमकुवत जनसंपर्क असलेले उमेदवार निवडणुकीत उतरवले गेले. याचा एकंदरीत परिणाम पक्षाच्या कामगिरीवर झाला. शेकापाचा शेवटचा बालेकिल्ला आहे ढासळला. पक्षाच्या निवडणूक इतिहासात ही पक्षाची सर्वात खराब कामगिरीसाठी ठरली. या पराभवामुळे पक्षाची ग्रामीण भागावर असलेली पकड सैल लावण्याची शक्यता आहे.
अलिबाग तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व
जिल्हा परिषदेच्या शहापूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाचे दिलीप भोईर (आवास गट ), सौ. रसिका केणी (आंबेपूर गट ) , सचिन राऊळ (चौल गट ), अनंत गोंधळी (कावीर गट ), सौ. मानसी दळवी ( थळ गट ), सौ. आदिती दळवी (चेंढर गट ) हे सहा उमेदवार विजयी झाले. आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी सौ. मानसी दळवी व सून सौ. आदिती दळवी विजयी झाल्या. जिल्हा परिषद निवडणूकीत सासू व सून निवडून येण्याचा इतिहास या दोघींनी घडवला आहे. बारा पंचायत समिती सदस्यही त्यांचे निवडून आले आहेत.

