शहरातील चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हमरीतुमरीमुळे गालबोट लागले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देवकर यांच्यावर तसेच राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आरोप केल्यावर देवकर यांनीही त्यास प्रत्युत्तर दिल्याने वातावरण चांगलेच तापले होते.
गळीताची सुरूवात गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आले. चोसाकाने या गळीत हंगामासाठी दोन हजार रूपये एकरकमी उचल भाव जाहीर केला आहे. देवकर यांनी जिल्हा बँकेचे अर्थसहाय्य दिले नाही तसेच मंत्री असूनही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप करत शेतकरी संघटनेचे अविनाश पाटील यांनी व्यासपीठावर जावून निषेध केला. देवकर यांच्या भाषणाच्या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील यांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे देवकर संतप्त झाले. देवकर व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात सुमारे १५ ते २० मिनिटे सभामंडपातच शाब्दिक चकमक झडली. कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेने कारखान्यासाठी अर्थसहाय्य केले नाही तसेच सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याची टीका केली. यावर स्पष्टीकरण देताना देवकर यांनी परिस्थिती चांगली नसलेल्या संस्थांना नाबार्ड आणि रिझव्‍‌र्ह बँकेने कर्ज देऊ नये असे धोरण ठरविल्याचे सांगितले. जिल्हा बँक सक्षम झाली पाहिजे. जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे. आधी कर्ज शेतकऱ्यांना आणि त्यानंतर सहकारी संस्थांना देण्यात येईल. यापुढेही कारखान्यासाठी जिल्हा बँक मदत देईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्यावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांनी प्रास्तविकात कारखान्याच्या अडचणीच्या परिस्थितीत बुलढाणा अर्बन बँकेने ४९ कोटीचे अर्थसहाय्य दिल्याचे सांगितले. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी सभासदांनी बाहेरच्या कारखान्यास ऊस देऊ नये, असे आवाहन केले. बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी कारखान्यास बँकेचे सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. व्यासपीठावर आ. जगदीश वळवी, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, पं. स. सभापती डी. पी. साळुंखे, जिल्हा बँक संचालक वाल्मिक पाटील आदी उपस्थित होते.