करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव देशात झाला असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कालच नव्यानं १० ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं होतं. याच दरम्यान महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात करोनाचा ‘आर काउंट’ १ च्या अगदी जवळ पोहोचला आहे. मुंबई-पुणे-ठाण्यात तर हा काउंट १पेक्षा पुढे गेलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर व्हॅल्यू किंवा आर काउंट हा करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संक्रमित झालेल्या लोकांची संख्या सांगते. सध्या, आर चा देशातील काउंट एकापेक्षा कमी आहे. परंतु काही मोठ्या शहरांमध्ये तो झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना आर काउंट वाढत आहे. कोणत्याही रोगाच्या प्रसाराच्या दराला री-प्रॉडक्शन नंबर म्हणजेच आर-व्हॅल्यू म्हणतात. एखादा आजार एखाद्या संक्रमित व्यक्तीद्वारे सरासरी किती लोकांमध्ये पसरू शकते, याची माहिती सांगणारा हा ‘आर’ क्रमांक असतो.

देशात महामारी संपण्यासाठी आर काउंट १ पेक्षा कमी असला पाहिजे. महाराष्ट्रात या आठवड्यात आर काउंट ०.९७वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये आर काउंट १पेक्षा जास्त आहे. पुण्यात तर हा काउंट १.१३वर पोहोचला आहे. तर मुंबई १.१०वर आणि ठाण्यात सर्वात जास्त १.१९ आहे. देशातील प्रमुख शहरांपैकी चेन्नई आणि बंगळुरूचा आर काउंट १.०४ वर आहे. तर राज्यांमध्ये कर्नाटक १.१२. जम्मू-काश्मीर १.०८ आणि तेलंगणा १.०५वर आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R value is more than 1 in many cities of maharashtra amid omicron variant hrc
First published on: 09-12-2021 at 17:14 IST