अतिवृष्टीग्रस्त सोलापुरातील रडार यंत्रणा बंद

कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर प्रकल्प धूळ खात

(संग्रहित छायाचित्र)

एजाजहुसेन मुजावर

सोलापूरसह शेजारच्या मराठवाडा परिसरात ढगांचा अभ्यास करण्यासाठी उभी केलेली रडार यंत्रणा गेले वर्षभर बंद आहे. ही यंत्रणा जर सुरू असती, तर बुधवारी झालेल्या अतिवृष्टीची पूर्वसूचना मिळाली असती. पर्यायाने झालेले नुकसान काही प्रमाणात तरी टळले असते, असा मतप्रवाह समोर येत आहे.

भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्थेच्या (आयआयटीएम) प्रमुख वैज्ञानिक डॉ. तारा प्रभाकरन यांच्या आधिपत्याखाली दोन वर्षांपूर्वी सोलापुरात कृत्रिम पावसाकरिता आवश्यक ढगांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग हाती घेण्यात आला होता. यासाठी सोलापूरजवळ केगाव येथे सिंहगड शिक्षण संकुलाच्या आवारात एका रडारचीही उभारणी करण्यात आली आहे. या रडारच्या माध्यमातून येथे २५ हवामान शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी ढगांचा अभ्यास केला. या अभ्यासानंतर येथे कृत्रिम पावसाचा प्रयोगही करण्यात आला. मात्र हा प्रयोग झाल्यावर संबंधित प्रकल्प बंद झाला. येथे काम करत असलेले शास्त्रज्ञही परतले. यामुळे कोटय़वधी रुपये खर्चून उभारलेली रडार यंत्रणाही बंद पडली. ही यंत्रणा जर आजही सुरू असती, तर बुधवारी झालेल्या अतिवृष्टीची पूर्वसूचना देता आली असती. यामुळे अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेली वित्त आणि जीवितहानी वाचवता आली असती, असे अभ्यासकांचे मत आहे.

प्रशासन अनभिज्ञ : सोलापुरात अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असताना त्यावर काम करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन प्रणाली कक्षासह प्रशासनाला केगाव येथील रडार यंत्रणेविषयी माहिती नसल्याचे दिसून येते. आपत्ती व्यवस्थापन प्रणाली कक्षाचे प्रमुख विशाल बडे यांनी, या संदर्भात माहिती घेऊ न कळवतो, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क झाला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Radar system shut down in heavy rains in solapur abn