अहिल्यानगर: सध्याच्या दुष्काळ परिस्थितीमुळे भविष्यात चारा टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण मंत्रिमंडळाच्या उपसमितीला चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव देणार आहोत, असे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.चारा टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नवे उपक्रम हाती घेतले पाहिजेत, ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रातून कमी पाण्यात, कमी खर्चात अधिक पोषक चारा तयार होतो, त्याचाही वापर केला पाहिजे असेही आवाहन मंत्री विखे यांनी केले.

राज्याच्या मंत्रिमंडळाने सर्व धरणातील पाणीसाठे पिण्यासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंत आरक्षित ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. धरणे भरले असली तरी लाभक्षेत्रात टंचाई परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व १४ ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तेथे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून आपण पाणी योजनांचा आढावा घेतला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनमार्फत ज्या योजनांची कामे थोडी अपूर्ण आहेत, योजना पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहेत, परंतु त्यांचे काम थांबले आहे, अशा योजना तातडीने हाती घेऊन त्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिले आहेत. ज्या योजनांची कामे अद्याप पूर्ण आहेत, मोठ्या योजना आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत, अशा योजना पूर्ण करण्यास वेळ लागेल. परंतु ज्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत त्या पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी, तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पाणीपुरवठ्याचे टँकर भरले जातात, तेथे फिल्टर प्लांट उभारून शुद्ध पाणी टँकरमार्फत वाड्यावस्त्यांवर पोहोचवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे तसेच पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी टँकरचे पाणी गावोगाव वितरित करताना ते टाकीमध्ये साठवले जावे, यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात, क्षमतेच्या पाण्याच्या टाक्याही उपलब्ध केल्या जाणार आहेत.’जी-राम-जी’ योजनेअंतर्गत आता मागेल त्याला काम उपलब्ध करण्यास कोणतीही अडचण जाणवत नाही, असेही पालकमंत्री विखे यांनी स्पष्ट केले.

विवाह सोहळ्यातील बडेजाव टाळा

सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी सामाजिक भान ठेवण्याची जबाबदारी पाळली पाहिजे, असे आवाहन करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, विवाह सोहळ्यात अनेकदा मोठी उधळपट्टी केली जाते. हळदी- सुपारीचे कार्यक्रमातही बडेजाव करण्याची अनेकांना हौस असते. मात्र आज ती वेळ नाही. अशा उधळपट्टीतून सामान्य नागरिकांवरही दबाव येतो. त्यांनाही खर्च करणे भाग पडते. त्यामुळे विवाह सोहळे काळाची पाऊले ओळखून कमी खर्चात व कमी लोकांमध्ये करून प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे.