राहाता: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय मोडून काढण्याची आवश्यकता असून, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करणे अपेक्षित आहे. नागरिकांमधील भीती दूर करून त्यांना थेट प्रशासनाशी जोडण्यासाठी लवकरच एक विशेष ‘हेल्पलाईन क्रमांक’ कार्यान्वित करण्यात येईल. याद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये नागरिकांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून प्रशासनामार्फत योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची नूतन इमारत व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ६४ निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पोलीस दलासाठी अत्याधुनिक चार फॉरेन्सिक लॅब व्हॅनचे लोकार्पणही करण्यात आले. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेश परजणे आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या धोरणानुसार पोलिसांच्या कल्याणासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यात आली असून, अहिल्यानगर शहरातील जिल्हा मुख्यालयात ३२२ निवासस्थानांचे काम सुरू आहे तसेच कोपरगाव (४८) व पाथर्डी (५४) येथील निवासस्थानांचे काम पूर्ण झाले असून, राहाता व शिर्डी येथे अद्ययावत पोलीस ठाण्यांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय व समृद्धी महामार्गांमुळे वाढणारी अंमली पदार्थांची तस्करी व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढवणे अत्यावश्यक आहे. याकरिता ५०० अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी शासनाकडे नोंदवण्यात आली आहे.

गुन्हेगारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन मंडळामार्फत सर्व महाविद्यालयांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून, ग्रामपंचायतींनीही लोकसहभागातून आपापल्या गावांमध्ये सीसीटीव्ही बसवून २४ तास लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, गुन्ह्यांचा तपास वेगाने व्हावा आणि न्यायदानात विलंब होऊ नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर अत्याधुनिक ‘फॉरेन्सिक व्हॅन’ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याद्वारे घटनास्थळी जलद तपासणी करणे शक्य होऊन तपासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगावमधील अवैध धंदे व गावठी दारूविक्रीवर कठोर करावी, समाजात चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचेही भाषण झाले. प्रातिनिधीक स्वरुपात पाच पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना गृहसंकुलाच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले, आभार पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी मानले.