अहिल्यानगर: पितृपंधरवडा संपताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना परत वेग आला आहे. बँकेतील प्रस्थापितांच्या विरोधात एकवटलेल्या विरोधी आघाडीने आज, सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोघांनीही खासदार नीलेश लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांना निवडणूक ठामपणे लढवण्याचा सल्ला देत निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
खासदार लंके, माजी खासदार लोखंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सिताराम काकडे व संदीप वर्पे, बँकेचे माजी संचालक अमित भांगरे व दत्तात्रय पानसरे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सुधीर मस्के यांनी शरद पवार व एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक भाजप नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी उमेदवारांचे शिष्टमंडळ शरद पवार व एकनाथ शिंदे यांना भेटले आहे. नीलेश लंके शरद पवार गटाचे खासदार आहेत तर सदाशिव लोखंडे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. बॅंकेच्या निवडणुकीत शरद पवार गट व शिंदे गट एकत्र आले आहेत.
यापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील थोरात गट व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील एकत्रित राष्ट्रवादी यांची युती होत असे. ही युती विखे गटाविरुद्ध निवडणूक लढवत असे. परंतु यंदाच्या निवडणुकीत प्रथमच परस्परांची विरोधक विखे व थोरात एकत्र आले आहेत. थोरात यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना लांब ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीचे उमेदवार शरद पवार यांना भेटण्याची घटना महत्वपूर्ण मानली जाते.
शिष्टमंडळात सहभागी पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार थोरात यांनी विखे यांच्याशी युती केल्याबद्दल शरद पवारांकडून नापसंतीची भावना व्यक्त करण्यात आली तर राज्यात राज्यातील सत्तेत एकत्र असूनही विखे यांनी शिंदे गटाला लांब ठेवल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजले. खासदार लंके यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सद्यस्थिती, आगामी निवडणुकीची दिशा व पुढील रणनीती या संदर्भात पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव जिल्ह्याच्या सहकार चळवळीला अधिक बळकटी देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
