राहाता: भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवनिका संस्थानला दारणा प्रकल्पातून पाणी देण्याच्या आदेशाची संपूर्ण चौकशीचे व पाण्याचे आरक्षण तातडीने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे खरात किती उच्चपदस्थांच्या संपर्कात होता हे सुद्धा आता उघड झाले असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लोणी येथे आज, शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्री विखे यांनी सांगितले की, शिवनिका संस्थानला दिलेले पाण्याचे आरक्षण तात्काळ रद्द करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. त्यावेळी हा अध्यादेश का काढण्यात आला, ‘नोटिंग फाईल’वर कोणाच्या सह्या आहेत, याची चौकशी केली जाईल. शिर्डी पोलिस प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेमुळेच खरातचे कारनामे उघड झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभिर दखल घेवून आरोपीला ‘लुकआऊट’ नोटीस काढल्यामुळे खरात कुठेही पळून जावू शकला नाही. या सर्व प्रक्रीयेमध्ये अहिल्यानगरचे पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक आणि पोलिस उपअधिक्षकांसह त्यांच्या सर्व पथकाने अतिशय संयमाने केलेल्या तपासामुळेच यासर्व घटना उघड होवू शकल्या. शिर्डी पोलिसांनी तयार केलेल्या पुराव्यांवरच आता नाशिकचे पोलिस तयास करीत आहेत. पोलिसांच्या कर्तृत्वावर मला शंका नाही, परंतू येवढ्या मोठ्या घटना घडत असताना नाशिकचे पोलिस प्रशासनाच्या नाकाखाली हे प्रकार घडत असताना तिथल्या गुप्तचर यंत्रणा, स्थानिक गुन्हे शाखा काय करत होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यावेळी मी मंदिराबाहेर होतो
समाज माध्यमांमध्ये प्रसारीत झालेल्या छायाचित्राचे स्पष्टीकरण देताना मंत्री विखे म्हणाले की, तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीमध्ये दर्शनासाठी आले होते. त्यानंतर ईशान्यश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. पालकमंत्री या नात्याने मला त्यांच्या दौ-यात बरोबर राहावे लागले. त्यांची पुजा होईपर्यंत मी स्वत: जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांसमवेत मंदिराबाहेर थांबून होतो. त्यामुळे खरातांशी माझा कुठला संपर्कही नाही. त्याच्या कर्तुत्वाबद्दल मी नंतर कधीतरी बोलेल. मात्र धर्माच्या नावाखाली निरापराध महिलांचे शोषण करणा-या नराधमास ऊशिरा का होईना अटक झाली. यासाठी नेमलेल्या विशेष चौकशी पथकातून अधिक माहीती समोर येईल.
रूपाली चाकणकरांनी पूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचे स्वागत करुन, यापुर्वीच त्यांनी राजीनामा द्यायला पाहीजे होता. आता त्यावर भाष्य करणे उचित नाही, मात्र त्यांनी दिलेला राजीनामा स्वागतार्ह आहे. संशयाचे वातावरण त्यांच्या भोवती निर्माण झाल्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा योग्यच आहे, अशी प्रतिक्रीयाही मंत्री विखे यांनी व्यक्त केली.
संजय राऊत यांना टोला
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलतांना विखे म्हणाले, खरंतर आरोपी पकडला आहे. मात्र विरोधक त्याचे राजकारण करीत आहे. त्यांच्याच काळात त्याला डोक्यावर घेतले गेले, पाणी दिले गेले. आपल्या काळातील पापाचे प्रायश्चित करण्याऐवजी आपले पाप दुसऱ्याच्या गळ्यात घालायला तुम्ही निघालात. खरंतर राउतांकडे अजून काही पुरावे असतील तर ते दिले पाहिजेत. एवढे पाणी तर सोडले होते. याशिवाय अजून काय काय सोडले ते देखील सांगावे, असे आव्हानही विखे यांनी राऊत यांना दिले.
