पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली. त्यानंतर त्यांनी अनेकदा या घोषणेचा पुनरुच्चार केला. विशेष म्हणजे त्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षातून अनेक नेते भाजपात दाखल झाले. महाराष्ट्रातही तेच पाहायला मिळालं. आता महाविकासआघाडी कोसळल्यानंतरही अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश होतो आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी भाजपाचे नेते आणि राज्याचे पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हळूहळू भाजपाचं काँग्रेस होतंय का? असा सवाल केला. यावर राधाकृष्ण विखेंनी उत्तर दिलं आहे. ते मंगळवारी (२७ सप्टेंबर) सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “भाजपाचं काँग्रेस होणार नाही. मला वाटतं, काँग्रेसकडे नेतृत्व राहिलं नाही. काँग्रेस दिशाहीन झाली आहे. आज राहुल गांधी भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. मला एकाने विचारलं त्याचा काय परिणाम होईल. मी म्हटलं आधी काँग्रेस छोडो सुरू झालंय त्याचा विचार यांनी आधी केला पाहिजे. जोडो नंतर करता येईल.”

“काँग्रेसला नेतृत्व नाही. आज अखील भारतीय काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण व्हावं यावर अनेक घडामोडी सुरू आहेत त्या आपण पाहतो. लोकांनी कोणाकडे आशेने पाहायचं? आज देशाला मोदींशिवाय पर्याय नाही,” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

“राज्यातील काही दूध संघांनी सरकारच्या अनुदानात अपहार केला, आता…”

राधाकृष्ण विखे पाटील सहकारी दूध संघांवर बोलताना म्हणाले, “पूर्वी ८०-९० टक्के दूध व्यवसाय सहकारी दूध संघांकडे होता. आज किती टक्के दूध हाताळण्याची व्यवस्था सहकारी संस्थांकडे राहिली आहे. अमूल सहकारी संस्थाच आहे. तो सर्वात मोठा सहकारी संघ आहे. ते गुजरातशिवाय महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात दूध संकलन करतात. त्या खासगी संस्था नाहीत. मात्र, आपल्या राज्यातील सहकारी संस्थांना दूध हाताळण्यात का अपयश आलं. याचा त्यांनीही विचार केला पाहिजे.”

“…तर सरकार शेतकऱ्यांचं दूध स्विकारेल”

“राज्यातील सहकारी दूध संघांच्या अपयशाचा परिणाम शेतकऱ्यांनी का भोगावा. शेतकऱ्याला दुधाची किंमत मिळाली पाहिजे. सरकारची खासगी दूध संघांना प्रोत्साहन देण्याची भूमिका अजिबात नाही. आधीचे दूध संघ नसल्याने आपलं दूध स्विकारलं जात नाही अशी स्थिती झाल्यास आणि शेतकऱ्यांचं दूध स्विकारण्याची वेळ आली, तर सरकार नक्की दूध स्विकारेल. सरकारकडे सर्व पर्याय आहेत,” अशी माहिती राधाकृष्ण विखेंनी दिली.

“सरकारच्या अनुदानाचा दूध संघांनी अपहार केला”

विखे पुढे म्हणाले, “मागे दूध जास्त झालं तेव्हा दूध भुकटी तयार करून शेतकऱ्याला दुधाचे भाव दिले पाहिजे यासाठी सरकारने काम केलं. सरकारने पाच रुपये प्रतिलिटर अनुदान दिलं. मात्र, काही दूध संघांनी त्या अनुदानाचा गैरवापर केला. शेतकऱ्यांना ते पैसे दिलेच नाहीत. सरकारच्या अनुदानाचा दूध संघांनी अपहार केला आहे. त्याच्या चौकशीचे आदेश दिले जात आहेत.”

हेही वाचा : “…मग गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे नेते भजी तळत होते का?”; राधा कृष्ण विखे पाटलांची खोचक टीका

“लम्पी रोग महाराष्ट्रामधील ३१ जिल्ह्यात पसरला”

“महानंदा दूध डेअरीची स्थिती बिकट झाली असून, त्यावर आम्ही प्रशासक नेमला आहे. महानंदाचं पुनर्जीवन करण्यासाठी जर एनडीडीबी पुढे येत असेल, तर तो पर्याय आम्ही ठेवला आहे. लम्पी रोग महाराष्ट्रामधील ३१ जिल्ह्यात पसरला आहे. असं असला तरी मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यामुळे मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण ठेवता आलं आहे. राज्यस्थान आणि पंजाबमध्ये जनावरांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये स्थिती चांगली आहे,” असंही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil comment on congress leaders joining bjp pbs
First published on: 27-09-2022 at 14:04 IST