Radhakrishna Vikhe Patil Covid Wedding Remark : गेल्या काही दिवसांपासून जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचं विखे पाटील कुटुंब चर्चेत आहे. स्वीडनच्या संसदेत नीला विखे पाटील निवडून गेल्यापासून विखे पाटील यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आले. दरम्यान, राज्यात दुष्काळ जाहीर झाला असून दुष्काळाच्या काळात जनतेने लग्न साध्या पद्धतीने करावं, असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

कोविडमध्ये साधेपणाने लग्न केलं त्यांना मुलं झाली नाहीत का?

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे डामडौलाने लग्न न करता साध्या पद्धतीने लग्न करा. कोविडमध्ये साधेपणाने लग्न झाले, त्यांना मुलं झाली नाहीत का?” असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला.

मोठेपणा यावर्षी तरी थांबवा

ते पुढे म्हणाले, “जो मोठेपणा करता तो यावर्षी तरी थांबवा अशी माझी विनंती. पाऊस कमी आहे.” तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे दुधाची भेसळ थांबली. त्यामुळे दुधाचे दर वाढले असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ३० टक्के दूध कमी झालं महाराष्ट्रात. त्यामुळे मागणी वाढल्याने दर वाढले आहेत”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राधाकृष्ण विखे पाटलांचं हे विधान राज्यभर चर्चेचा विषय बनलं आहे. यावर आता प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. “राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्या मुलांकडे आधी पाहावं. दुष्काळात साधेपणाने लग्न करा या सूचना चांगल्या आहेत. पण त्यांच्यासारख्या श्रीमंत घराण्यांनी लक्ष ठेवावं. सामान्य माणसांना साधेपणानेच व्यवहार करावा लागतो. शेतकरी, कष्टकरी, कामगारांना. पैशांचा माज सम्राट लोक दाखवतात”, असं संजय राऊत म्हणाले.