अहिल्यानगर : दुष्काळग्रस्त भागाला पाणी देणे बाळासाहेब थोरात यांना जमले नाही, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. आता राहुरीची पोटनिवडणूक त्यांनी गांभीर्याने घेतलेली दिसते. स्वतःची संगमनेरची निवडणूकही अशीच गांभीर्याने घेतली असती तर बरे झाले असते, असा टोला जलसंपदाचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी थोरात यांना लगावला आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मंत्री विखे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार मोनिका राजळे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अक्षय कर्डिले, सुरसिंग पवार, नामदेव ढोकणे, आरपीआयचे सुरेंद्र थोरात, काशिनाथ लवांडे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री विखे यांचा साकळाई योजनेच्या कामास मंजुरी व १२३४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले, याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले राहुरीची निवडणूक त्यांनी गांभीर्याने घेतलेली दिसते. आमची हरकत नाही, त्यांनी संगमनेरची निवडणूकही अशीच गांभीर्याने घेतली असती तर बरे झाले असते.
साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर झाल्याकडे लक्ष वेधले असता, बाळासाहेब थोरात यांनी मंत्री जिल्ह्यातीलच आहेत, याकडे सकारात्मक पहा, अशी टिप्पणी केली. त्यावर उत्तर देताना विखे म्हणाले, दुष्काळग्रस्त भागाला त्यांना पाणी देणे कधी जमले नाही. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. निळवंडीची चर्चा आयुष्यभर केली, पण निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांना आम्ही दिले. साकळाई योजनेमुळे १० हजार हेक्टर ओलिताखाली येणार आहे. त्यांच्या सरकारला हे जमले नाही. हे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. योजना मंजूर झाल्याचा सर्वाधिक आनंद आमदार शिवाजी कर्डिले यांना झाला असता, कर्डिले यांच्यासह सुजय विखे यांनी त्यासाठी प्रयत्न केले.
अक्षय कर्डिले सोमवारी अर्ज दाखल करणार
भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले सोमवारी (दि. ६) भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मंत्री विखे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे सुतोवाच केले होते, याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले, अद्याप अर्ज दाखल होत आहेत, मागे घेण्यासाठी अवधी आहे. अजून बराच कालावधी जायचा आहे.
