अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये सुरू केलेले आंदोलन म्हणजे केवळ ‘चमकोगिरी’ असल्याची टीका जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. सर्व काही ठेका आपल्यालाच मिळायला हवा आहे, असे त्यांना वाटते असा टोलाही विखे यांनी त्यांना लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदास बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री विखे बोलत होते. यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, समन्वयक विनायक देशमुख, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक निखिल वारे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, कार्यालयीन चिटणीस मुकुल गंधे आदी उपस्थित होते. यावेळी मोदी यांच्या निर्णयांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन विखे यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्जमुक्ती योजनेतील अटी व शर्ती रद्द करून सरसकट कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता २२ जूनपर्यंत आहे. त्यानंतर शेतकरी कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. असे असतानाही रोहित पवार आंदोलन करत आहेत, म्हणजे चमकोगिरीच दिसते, अशा शब्दांत विखे यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाची संभावना केली.

दरम्यान अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुटखामाफीया व दूध भेसळीविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेचे मंत्री विखे यांनी स्वागत केले. ते म्हणाले दूध भेसळ हा मोठा रोग आहे. त्यामुळे त्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागतच करतो.

विलीनीकरणाने काय फरक पडणार?

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे विलीनीकरणाची चर्चा सध्या सुरू आहे याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उरलेस उरले अस्तित्व संपत आले आहे आता त्यांनी विलीनीकरण केले काय आणि नाही केले काय फरक काय पडणार आहे?

‘जलजीवन मिशन’मध्ये सुधारणा घडवू

मोदी सरकारने आणलेल्या ‘हर घर जल’ अर्थात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाला, योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले, योजनेचा उद्देश चांगला आहे. मात्र अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने त्यामध्ये भ्रष्टाचार केला. राज्य सरकार या योजनेत योग्य त्या सुधारणा घडवेल.

पानसरे यांच्या माघारीचे व्हिडिओ चित्रीकरण

अहिल्यानगर विधानपरिषद निवडणुकीत दबावाने आपल्याला माघार घ्यायला लावली असा आरोप राज्य पणन महासंघाचे माजी अध्यक्ष तथा निवडणुकीतील उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी केला. त्यावर बोलताना मंत्री विखे यांनी असे काही घडले नाही. माघार घेत असल्याचे पानसरे यांच्या म्हणण्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.