Radhakrishna Vikhe Patil On Nila Vikhe Patil : स्वीडनच्या खासदार नीला विखे पाटील आणि महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार नीला विखे पाटील यांनी आपल्या राजकीय यशाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याची टीका राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांच्यावर केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता नीला विखे पाटील यांनी केलेल्या श्रेयवादाच्या टीकेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.’तो आमचा कौटुंबिक प्रश्न आहे’, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना यावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

स्वीडनच्या खासदार नीला विखे पाटील यांनी केलेल्या श्रेयवादाच्या टीकेबाबत पत्रकारांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारला. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. विखे पाटील म्हणाले की, “तो आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. आम्ही अंतर्गत पाहू काय करायचं ते”, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

‘आम्ही फ्लेक्स लावले की जाहीर सत्कार ठेवला?’: सुजय विखे

नीला विखे यांनी केलेल्या टीकेला सुजय विखे यांनीही प्रत्युत्तर दिलं. “नीला विखे तिकडे खासदार झाल्या ही माहिती आम्ही इकडे पत्रकार परिषद घेऊन दिली का? आम्ही फटाके फोडले का? आम्ही काय फ्लेक्स बोर्ड लावले का? की आम्ही त्यांचा जाहीर सत्कार ठेवला? नाही”, अशा शब्दांत सुजय विखे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना नीला विखेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

‘श्रेय घेण्याचा प्रश्न कुठे येतो?’

“आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर भाषण करत असताना मी मार्मिकतेत बोलत होतो. भारतात जरी एका विखे पाटलाचा पराभव झाला असेल तरी परदेशात एक विखे पाटील खासदार झाला. यामध्ये कोणाचं श्रेय घेण्याचा प्रश्न कुठे येतो? त्या स्वतःच्या कर्तृत्वाने तिकडे काम करत आहेत, आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने इकडे काम करत आहोत. मग यामध्ये कोणाच्या श्रेय वादाचा विषय कुठे येतो?”, असा सवाल सुजय विखे यांनी केला.

नीला विखे पाटील काय म्हणाल्या होत्या?

स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नीला विखे पाटील यांचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी कौतुक केलं होतं. मात्र, यानंतर नीला विखे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. “गेल्या दशकभरात ज्यांच्याशी माझा कोणताही संबंध राहिलेला नाही, ते माझ्या राजकीय यशाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं नीला विखे यांनी म्हटलं होतं.