मुंबईः जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चिखली (ता.श्रीगोंदा) साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल १२३४ कोटी १३ लाख रुपयांच्या तरतुदीस बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
श्रीगोंदा आणि अहिल्यानगर या दोन तालुक्यातील ३२ गावांमध्ये अनेक वर्षांपासून बुहतांश वेळा उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. सदर भागातील पशूधन व शेती टिकविण्यासाठी तसेच स्थलांतर थांबविण्यासाठी सरकारला अनेक उपाययोजना व प्रोत्साहनपर निधी द्यावा लागतो. त्यामुळे सिंचन टंचाईची समस्या सोडविण्यासाठी ही साकळाई उपसा सिंचन योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
साकळाई उपसा सिंचन योजना घोड धरणाच्या जलाशयावरील म्हसे या गावात उभी केली जाणार आहे. म्हसे गाव येथून चार टप्प्यांमध्ये पाणी उचलून ते श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील ३२ गावांसाठी वापरता येणार आहे. यामुळे या अवर्षणग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यासह सुमारे ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रास सिंचन उपलब्ध होणार आहे. या योजनेत लाभक्षेत्रात विकेंद्रीत जलसाठे निर्माण केले जाणार आहेत. त्यामध्ये लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे व गाव तलावांचा वापर केला जाणार आहे. या योजनेमुळे सिंचनासाठी १.६ टीएमसी व पिण्यासाठी ०.२० टीएमसी असे एकूण १.८० टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.
