राहाता: बदलत्या काळानुसार ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने त्याचे काही दुष्परिणामही दिसून येत आहेत. अनेक विद्यार्थी मोबाईल आणि समाज माध्यमांच्या अतिवापराच्या आहारी जात असल्याने शाळेमधील समाज माध्यम बंद करण्याचा प्रथम निर्णय अहिल्यानगर जिल्हा परिषदेने घ्यावा असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रवरानगर येथे आज, शनिवारी आयोजित केलेल्या शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री विखे बोलत होते. माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, राजेश परजणे, शिक्षक आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील (प्राथमिक), बाळासाहेब बुघे (योजना) व संध्या गायकवाड (माध्यमिक) आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा समाज माध्यम व मोबाईलचा वापर मर्यादित करण्यासाठी पालक, शिक्षक आणि शालेय प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे आचरण विद्यार्थी अनुकरण करीत असल्याने शिक्षकांनी स्वतः मोबाईलचा वापर शालेय वेळेत कमी केल्यास विद्यार्थ्यांमध्येही त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल.

ग्रामीण व तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थी सरकारी शाळांकडे वळू लागले आहेत. ही बाब सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेवर असलेला विश्वास अधोरेखित करणारी असल्याचे विखे यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा पाया असून हा पाया भक्कम झाला तर देशासाठी आदर्श नागरिक घडविणे शक्य होईल. शिष्यवृत्ती परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे, ही अभिमानाची बाब आहे. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या विविध मागण्या यावेळी मांडल्या. प्रस्ताविक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.

पुरस्कार्थींची नावे

सुमन खतोडे, ( नवलेवाडी, अकोले), दिपाली रेपाळ, (जाखुरी, संगमनेर), सुनील पोरे, (घोयेगाव, कोपरगाव), संदीप कोरडे, (गोरडे वस्ती, राहाता). स्वाती पटारे, ( अशोकनगर, श्रीरामपूर), सुवर्ण कचरे ( कुक्कडवेढे, राहुरी), राहुल आठरे ( भालगाव, नेवासा), सुरेखा खाडे, (राजनी, पाथर्डी), अमोल पवार (बावी, जामखेड), अमोल हुमे (अंबिकानगर, कर्जत), शहाजी खराडे, ( भानगाव, श्रीगोंदा), प्रवीण कुमार झावरे ( टाकळी ढोकेश्वर, पारनेर), मनोज काशीद,(खोसपुरी, नगर), किशोर मिसाळ (झिरपे शवस्ती, शेवगाव) तसेच केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, (धांदरफळ, संगमनेर) व केंद्रप्रमुख रामराव निकम, (पाटोदा, जामखेड).

सभापती राम शिंदे यांची कार्यक्रमाकडे पाठ

प्रवरानगर येथील शिक्षक पुरस्कार वितरण सभारंभाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे आज, शनिवारी दिवसभर जिल्ह्यात असतांनाही त्यांनी तसेच जिल्ह्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या आमदार व खासदार यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली. मंत्री विखे व राम शिंदे एकाच पक्षात असले तरी जिल्हा बँके निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचे यासाठी विखे यांनी कंबर कसली आहे तर राम शिंदेंनी आपली स्वतंत्र रणनीती सुरू केली आहे. विखे व शिंदे या दोघांकडून सहकारातील नेत्यांच्या स्वतंत्र गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत. दोघे भाजप अंतर्गत परस्परांचे विरोधक मानले जातात. त्यामुळेच राम शिंदे यांच्या अनुपस्थितीचे वेगळे संदर्भ उमटत आहेत.