भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. विखे पाटील यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यामुळे विलीगीकरणात जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाची लागण झाल्यामुळे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्द्ल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान विखे पाटील यांनी भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या लग्न सोहळ्याला विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या सोहळ्याला मोठी गर्दी होत करोनाबाबत असलेल्या नियमांचे पालन न झाल्याची चर्चा रंगली होती.