संगमनेर : सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जावून दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत कार्यवाही करावी. ‘झिरो’ अधिकारी नेमून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कोणावरही कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.

आज, रविवारी संगमनेरमध्ये झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार अमोल खताळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हाई अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी अरूण उंडे, तहसिलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे आदी उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री विखे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. ‘झिरो’ पशुवैद्यकीय अधिकारी नेमून कारभार सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी आल्या. लस देण्याचे जादा पैसे घेतले जात असून चारा उत्पादनासाठी कोणत्या शेतकऱ्यांना बियाणे दिले याची माहिती सांगता न आल्याने पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी हिंगे यांना दिले. चारा उत्पादनाबाबत अधिक गांभीर्याने नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट करून पुढील सहा महिन्यांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनीने आवश्यकता असेल तेथे तातडीने रोहित्र बदलून द्यावीत. पुढील एक महिन्यात वीजेच्या संदर्भातील सर्व प्रश्न निकाली काढाण्याच्या सूचना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांबाबत कागदावर वेगळी आणि बैठकीत दुसरीच माहीती दिली जात असल्याकडे त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. योजनांच्या पूर्ततेसाठी किती निधीची आवश्यकता आहे याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी बैठकीत झाल्या.

साकूर भागातील पाझर तलाव भरून देण्यासाठी प्रस्तावित उपसा सिंचन योजनेला २२५ कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. भोजापुरच्या कालवा पूरचारीसाठी ४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, नदीजोड प्रकल्पात प्रकल्पाचा समावेश झाल्याने निधीची अडचण भासणार नसल्याचे मंत्री विखे यांनी स्पष्ट केले.

आमदार खताळ पाटील म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला असून, या कठीण परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पंचनाम्यांच्या याद्या केवळ ग्रामपंचायतीच्या फलकावर न लावता समाज माध्यमांतून गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.