राहाता : राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचे पुढच्या पावसाळ्यापर्यंत नियोजन करावे लागणार आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य आणि त्यानंतर उर्वरित पाणी शेतीसाठी, असा प्राधान्यक्रम राहणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने विवाह करावेत, असे आवाहनही मंत्री विखे यांनी केले. लोणीत ते माध्यमांशी बोलत होते.
जनावरांच्या चाऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे यांनी सांगितले की, चारा उपलब्ध करून देण्यासाठी डीबीटी यंत्रणेचा वापर करावा. पशुधनाची जनगणना झालेली आहे. लम्पी आजारामध्ये जनावरांच्या लसीकरणाचा विदाही प्रशासनाकडे उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चाऱ्याचे थेट अनुदान डीबीटीच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. एक नवी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध झाली आहे, तिचा उपयोग करून घेतला पाहिजे. चारा छावण्यांच्या बाबतीत यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. यापूर्वी अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले. एक अधिवेशन तर चारा छावण्यांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे गाजले होते, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील तीन महिने चारा पुरेल इतकी उपलब्धता असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्री विखे हे लोणी येथून सहभागी झाले होते. या बैठकीत मंत्री विखे यांनी राज्यातील वाढत्या वीज टंचाईच्या बाबतीत शासनाने तातडीने व गांभीर्याने काही ठोस निर्णय घ्यावे लागतील, अशी आग्रही सूचना केली. ग्रामीण भागातील भारनियमनाच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व संवेदनशील वातावरण निर्माण झाले असल्याकडे त्यांनी महसूल मंत्र्यांचे विशेष लक्ष वेधले.
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी मराठवाड्यात जाऊन ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्याच्या वल्गना केल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला. एक रुपयाची मदतसुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना केली नव्हती. – राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री
क्रीडा अकादमीची स्थापना
लोणी येथे क्रीडा अकादमीची स्थापना करून सर्व खेळाडूंना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करून देणार आहे. या माध्यमातून खेळाडूंना अद्ययावत सुविधा दिल्या जातील. पुरस्कारप्राप्त खेळाडूंना यामध्ये सल्लागार म्हणून नेमणूक करून त्यांचा अनुभव आणि सूचनांमधूनच जिल्ह्याच्या क्रीडा विकासाचा एक नवा अध्याय सुरू केला जाणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विखे पाटील क्रीडारत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
