Radio Uncle Mumbai graffiti news : रेडिओ अंकल (RADIO UNCLE) हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून माहीम, माटुंगा आणि दादरमधील रहिवाशांना भिंतींवर, कंपाऊंडच्या गेटवर आणि दुकानांबाहेर रंगवलेले दिसत होते. या नावासोबत कोणताही फोन नंबर किंवा पत्ता नसल्यामुळे, ‘रेडिओ अंकल’ नेमके कोण आहेत, याबद्दल कोणालाच फारशी माहिती नव्हती. मात्र, आता एका पोलीस प्रकरणामुळे त्यांचे गूढ उकललं असून, हे नाव ७३ वर्षीय रवी रामलाल कपूर यांचं असल्याचे समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे.

सार्वजनिक मालमत्तेवर जाहिरात केल्याने गुन्हा दाखल

माहीमचे रहिवासी असलेले कपूर गेल्या दशकभरापासून या परिसरामध्ये फिरून जुनी हिंदी गाणी वाजवत स्पीकर विकण्याचे काम करतात. शिवाजी पार्क पोलिसांनी कपूर यांच्याविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा, १९९५’ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पालिकेच्या परवाना निरीक्षकांना पालिकेची ‘सिटी ऑफ लॉस एंजेलिस म्युनिसिपल स्कूल’, मनमाला देवी मंदिरातील विहीर, गोखले रोडजवळील लक्ष्मी सदन, पाटकर हाऊस आणि इतर अनेक ठिकाणी “RADIO UNCLE” असं लिहिलेलं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, हे लिखाण कपूर यांच्या व्यवसायाची जाहिरात होती आणि सार्वजनिक मालमत्तेवर परवानगीशिवाय जाहिरात करण्यात आली होती.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच इंडियन एक्स्प्रेसने रवी रामलाल कपूर यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले होते की, हे फलक त्यांनी स्वतःहून रंगवलेले नसून एका व्यक्तीने त्यांच्यासाठी रंगवले होते. काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मदत करण्याच्या हेतूने आपण त्याला होकार दिला होता, असं कपूर म्हणाले. “त्याने स्वतःला कलाकार असल्याचं सांगितलं आणि मला कष्ट करणाऱ्या लोकांना पाठिंबा द्यायला आवडतो”, असं कपूर यांनी नमूद केलं. नंतर त्यांनी त्या व्यक्तीला हे काम थांबवण्यास सांगितलं होतं, पण त्यासाठी त्यांनी किती पैसे दिले किंवा किती जागांवर हे लिहिलं गेलं, याबद्दल त्यांनी स्पष्ट काही सांगितलं नाही.

कोण आहेत रवी कपूर?

माहीम पश्चिमच्या अंतर्गत गल्ल्यांमधून सुरू झालेली ही नावे नंतर माटुंगा, दादर, प्लाझा सिनेमा जंक्शन आणि दादर ओव्हरब्रिजपर्यंत पसरली होती. काही ठिकाणी तर ही अक्षरे मरून रंगात रंगवली होती. पण या परिसरातील अनेक लोक ‘रेडिओ अंकल’ यांना आधीपासूनच ओळखत होते. माटुंगा पश्चिम येथील एका चप्पल दुरूस्ती करणाऱ्या व्यापाऱ्याने त्यांचं वर्णन, “सायकल आणि स्कूटीवरून फिरणारा आणि मोठ्या आवाजात जुनी हिंदी गाणी वाजवणारा माणूस” असं केलं. माटुंगा ब्रिजजवळील एका किल्ली बनवणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, त्यांनी कपूर यांना शिवाजी पार्क येथे गाणी वाजवताना आणि रेडिओ व स्पीकर विकताना पाहिले आहे. कपूर सहसा सकाळी ८ च्या सुमारास शिवाजी पार्कजवळ एक स्पीकर लावून, दुसरा बाजूला ठेवून आणि अनेक स्पीकर असलेली मोठी बॅग घेऊन बसलेले असायचे. “गेल्या १० वर्षांपासून हा माझा नित्यक्रम आहे,” असं कपूर यांनी सांगितलं होतं. “मी येथे येतो, लोकांना चांगल्या संगीताचा आनंद देतो आणि या आशेने गाणी वाजवतो की ते माझ्याकडून एखादा स्पीकर खरेदी करून संगीताला त्यांच्या आयुष्याचा भाग बनवतील.”

स्पीकरबरोबर देतात खास गिफ्ट

कपूर हे सहा वर्षांपूर्वी त्यांच्या छोट्या इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायातून निवृत्त झाले. मूळचे सिंध प्रांतातील असलेले कपूर यांचे शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंत झाले असून, ते माहीममधील शितलादेवी मंदिराजवळील पेरेरा मॅन्शन येथे राहतात. निवडक दुकानांतून आणलेल्या त्यांच्या स्पीकरची किंमत ६०० ते २,००० रुपयांच्या दरम्यान आहे. ग्राहकांना असे स्पीकर ऑनलाईन मिळू शकतात याची कपूर यांना कल्पना आहे, परंतु त्यांची निवड आणि सोबत दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त वस्तूंमुळे म्हणजे रेडिओ अंकल लिलिहेली टोट बॅग, मॅग्नेट सारख्या वस्तूंमुळे ग्राहकांना पैशांचे योग्य मूल्य मिळतं, असा त्यांचा विश्वास आहे.

जुन्या संगीतातील त्यांची आवड ‘सारेगामा कारवां’ रेडिओमुळे निर्माण झाली. “मी सारेगामा कारवां रेडिओपासून प्रेरित झालो, ज्याने मला संगीताची आवड पसरवण्यासाठी हे काम सुरू करण्याची प्रेरणा दिली”, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांवर सविस्तर चर्चा केली आणि साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी आणि शैलेंद्र हे त्यांचे आवडते गीतकार असल्याचं सांगितलं. पेशाने वकील असलेल्या त्यांच्या मुलाने त्यांच्यासाठी स्पीकरची माहिती आणि फोन नंबर असलेली एक ‘एआय-जनरेटेड’ माहितीपुस्तिका देखील तयार केली आहे.