राहाता:पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता नुकसान भरपाईच्या पंचनाम्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. दुष्काळ पंचनामे करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने शेतकऱ्यांची कागदपत्रे जमवण्यात धावाधाव होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
ई-पीक पाहणी, जिओ टॅगिंग फोटो, आधार कार्ड, फार्मर आयडी, बँक पासबुक, मोबाइल क्रमांक तसेच सामायिक क्षेत्र असल्यास संमती पत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन, कपाशी, मका, तूर या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ई-पीक पाहणी झाली तरी त्याची नोंद, जिओ टॅगिंग, फोटो आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता याबाबत अनेक शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नाही. गावपातळीवर आवश्यक कागदपत्रांची शेतकऱ्यांना स्पष्ट माहिती द्यावी, गावात दवंडी देऊन अवगत करावे, अशी शेतकरी मागणी करीत आहेत.
शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी पीक पाहणी, आधार कार्ड, फार्मर आयडी, मोबाइल क्रमांक, बँक पासबुक, पॅन कार्ड, पिकाचा जिओ टॅगिंग फोटो अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे.
सामायिक क्षेत्र असल्यास संबंधित शेतकऱ्यांचे संमतीपत्रही आवश्यक असल्याने ही सर्व कागदपत्रे जमा करून ते तलाठी कार्यालयात देण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात एकच गर्दी केल्याचे दिसत आहे.
अडचणींसाठी बैठक घेणार
सरकारच्या आदेशानुसार पंचनामे करण्याचे काम वेगाने चालू आहे. या संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली जाणार आहे व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन केले जाईल.-माणिक आहेर, उपविभागीय महसुल अधिकारी, शिर्डी
पंचनाम्यांचे काम ७५ टक्के पूर्ण
पिकांचे पंचनामे करण्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. नुकसान परत्वे पंचनामे करण्यात येत आहे. लवकरात लवकर याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे ऑफलाईन जमा करून घेण्यात येत आहे.-आबासाहेब भोरे, तालुका कृषी अधिकारी
