राहाता : राहाता गावाकडून नगरसुल (या. येवला) गावाकडे दुचाकीवरून जाणारे दाम्पत्य कंटेनरखाली सापडून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. हा अपघात आज, शनिवारी दुपारी कोपरगाव शहराजवळील येवला नाका येथे झाला.
संगीता रामकृष्ण महाले असे मृत महिलेचे नाव आहे. यामध्ये पती रामकृष्ण महाले जखमी झाले आहेत. महाले दाम्पत्य दुचाकीवरून जात होते. येवला नाका येथे रस्त्यावर एका बाजूने ऊस विक्रेते, खरेदी करणाऱ्यांची गर्दी तर दुसरीकडे वाहनांची वर्दळ यामुळे महाले यांची मोटारसायकल रस्त्यावर पडली. त्याचवेळी महाले दाम्पत्य कंटेनरच्या मागील चाकाखाली आले. संगीता महाले यांचा जागीच मृत्यू झाला. रामकृष्ण महाले गंभीर जखमी झाले. कोपरगाव शहर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
महामार्गालगत येवला नाका परिसरात उसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर उभे राहतात, यामुळे वारंवार अपघात होतात, असे नागरिक सांगतात. अपघातानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प होती. पोलिसांनी उसाचा ट्रॅक्टर व एक मालमोटर ताब्यात घेतली.