अकोले: देशी बियाण्यांच्या जतन संवर्धन चळवळीसाठी प्रसिद्ध असलेल्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित येथील राहीबाई पोपेरे यांना राज्य परिवहन महामंडळाच्या अकोले आगाराकडून सन्मानपूर्वक प्रवास सवलत परवान्याचे वितरण करण्यात आले. आगारप्रमुख सुरेश दराडे यांच्या हस्ते या परवान्याचे वितरण करण्यात आले.
राज्यातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना राज्य परिवहन मंडळाकडून अशा सवलती दिल्या जातात. या सवलतीचा लाभ आपल्या बीजमातेलाही व्हावा ही इच्छा अकोल्यातील एसटी कर्मचाऱ्यांची होती. तिला मूर्त स्वरूप आगर व्यवस्थापक सुरेश दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले आहे. अकोले आगारात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या परवान्याचे वितरण करण्यात आले. या सवलतीचा उपयोग करून राज्यअंतर्गत विविध ठिकाणी कार्यक्रमांसाठी राहीबाई यांना त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्तीला विनामोबदला प्रवास करता येणार आहे. या सुविधेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेऊन आदिवासी विकास विभाग यांच्याकडून त्यांना विशेष प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मोफत या सवलतीची व्यवस्था करून देण्यात आल्याचे आगारप्रमुख दराडे यांनी सांगितले.
परवाना वितरण कार्यक्रमात बोलताना दराडे यांनी राहीबाई यांच्या रूपात ‘मी माझी आईच बघतो’, असे भावपूर्ण उदगार काढले. काष्टी साडी नेसणारी ही शेवटची पिढी आहे यानंतर काष्टी साडी नेसणाऱ्या महिला दिसणार नाहीत, अशी त्यांनी खंत व्यक्त केली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन अकोले आगाराचे वरिष्ठ लिपिक सचिन वाकचौरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी योगेश वाघमोडे, अनिता दराडे, निशा गोंदके, योगिता राक्षे, आदर्श वाहक कविता नागरे आदी उपस्थित होते.
अकोले तालुक्यातील कोंभाळणे हे राहीबाई यांचे मूळ गाव. त्या शाळेत कधी गेल्या नाहीत. पण वडिलांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गाच्या शाळेत शिकल्या. काळाच्या ओघात लुप्त होत असलेल्या देशी बियाणांच्या जतन संवर्धनाचे काम त्यांनी केले. त्यांच्या बियाणांच्या बँकेत ५४ पिकांचे ११४ पेक्षा अधिक वाण आहेत. त्यांचे काम व बियाणाचे ज्ञान पाहून ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरानी एका कार्यक्रमात त्यांचा “सीड मदर” असा उल्लेख केला होता. तेव्हापासून त्या बिजमाता म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या बियाणे बँकेत गावरान पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, औषधी वनस्पती यांचे बियाणे जतन केलेले आहे. २०२० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘बीबीसी’ने २०१८ मध्ये त्यांचा जगातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये समावेश केला होता. नारीशक्ती पुरस्काराबरोबरच त्यांना विविध संस्थांचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कोंभाळणे येथील त्यांची ‘बियाणे बँक’ पहाण्यासाठी राज्याबरोबरच देशभरातून विद्यार्थी, संशोधक, शेतकरी येत असतात. कधीही शाळेत न गेलेल्या राहीबाईना आज शाळा, महाविद्यालयात व्याख्यानांसाठी आवर्जून बोलविले जाते.

