BJP Backfoot Maharashtra Politics Analysis: “भाजपा सत्तेत आल्यापासून गेल्या १२ वर्षांत क्रियावादी होते. मात्र आता परिस्थिती बदलत असून विरोधक राजकीय कथानक रचत आहेत आणि भाजपाला त्यावर खुलासा द्यावा लागत आहे. हा मोठा बदल अलीकडच्या काळात दिसत आहे”, अशी भूमिका लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘लोकसत्ता दृष्टीकोन’ या कार्यक्रमात मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित केले. या बैठकीतील भाषणात त्यांनी बहुसंख्य वेळ हा राहुल गांधींना उत्तर देण्यात घालवला, अशी आठवण गिरीश कुबेर यांनी यावेळी करून दिली.
भाजपा बॅकफूटवर?
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर मुलभूत मुद्द्यांवर लोकांनी लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे. शिक्षण, रोजगार, रस्ते अशा विषयांवर लोक सजग होत आंदोलन करत आहेत, असे सांगत असताना गिरीश कुबेर यांनी ठाणे वर्षा मॅरेथॉन दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा दाखला दिला. राजकीय विचारधारा बाजूला जावून मुख्य मुद्दे आता चर्चेत येऊ लागले आहेत. २०१४ साली भाजपाही राजकीय विचारधारा नाही तर विकासाचे मुद्दे घेऊन पुढे आले होते. त्याचप्रकारचे मुद्दे काँग्रेसकडून मांडले जात आहेत, असेही ते म्हणाले.
दिपके आणि बापट पुढे येणे लक्षवेधी
दलित पार्श्वभूमी असलेले अभिजीत दिपके हे शिक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे आले. तर पुण्यातील बापट यांनी डिजे, लाऊडस्पीकरला विरोध दर्शवला आहे. यावर बोलत असताना गिरीश कुबेर म्हणाले, दिपके आणि बापट हे दोघे सरकारसाठी एकाचवेळी डोकेदुखी ठरत असतील तर सरकारने आपल्या मुद्द्यांची तपासणी करण्याची वेळ आली आहे, असे म्हणावे लागेल.
‘तो’ भाजपाचा सर्वात मोठा पराभव
गिरीश कुबेर पुढे म्हणाले, “भाजपाने विकसित भारत, अच्छे दिन आणि इतर सकारात्मक घोषणा पुढे करून निवडणूक जिंकली, त्या पक्षाला पुन्हा धार्मिक मुद्दे पुढे करावे लागत असतील तर तो निश्चितच त्यांचा पराभव आहे. जर भाजपाकडून इतर राजकीय विचारधारा किंवा धार्मिक मुद्दे पुढे केले जात असतील तर त्यांच्या विकासाच्या कार्यक्रमाला स्वपक्षातून तडा गेला की काय? हा प्रश्न निर्माण होतो.”
