scorecardresearch

सुरत न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द; शरद पवार म्हणाले, “ही कारवाई म्हणजे…”

सुरत न्यायालयाने राहुल गांधी मानहानी प्रकरणात दोषी ठरवले होते. तसेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

sharad pawar
शरद पवार

राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंदर्भात ट्वीट करत भाष्य केलं.

हेही वाचा – राहुल गांधींनी १० वर्षांपूर्वी फाडलेला अध्यादेश आज बनला असता त्यांच्यासाठी ‘संकट मोचक’

काय म्हणाले शरद पवार?

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सूचक विधान केलं आहे. राहुल गांधींवर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई ही राज्यघटनेच्या मूळ रचनेलाच धक्का लावणारी आहे. लोकशाही मूल्यं पायदळी तुडवणारी आहे. आपल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

राहुल गांधींवरील कारवाईवरून काँग्रेस आक्रमक

दरम्यान, राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राहुल गांधी सत्य मांडत होते आणि मांडत राहणार. हे त्यांना पचत नाही. त्यामुळे राहुल गांधींवर समस्या संपतील असं त्यांना वाटत असेल. पण, त्यांच्या समस्या संपणार नाहीत. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू. लढत राहू… लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागलं तरी तयार आहोत,” असे ते म्हणाले.

याबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडलं आहे. आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या मित्रांनी लाखो-हजारो कोटी रुपये देशातून पळवले आहे. मात्र, त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि मोदी सरकारचा धिक्कार करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 21:44 IST

संबंधित बातम्या