वीर सावरकर यांना माफीवीर म्हणत राहुल गांधींनी टीका केली होती. त्याच प्रमाणे २०२३ ला राहुल गांधींनी वीर सावरकरांबाबत आणखी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुनही २०२३ मध्ये आपण राहुल गांधींच्या विरोधात खटला दाखल केला आहे अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी दिली आहे. ब्रिटनच्या भाषणात राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. सात्यकी सावरकर यांनी याच प्रकरणी हा खटला दाखल केला आहे.
सात्यकी सावरकर काय म्हणाले?
२०२३ मध्ये मी राहुल गांधींच्या विरोधात खटला दाखल केला आहे. कारण मार्च २०२३ मध्ये राहुल गांधी ब्रिटनमध्ये होते. त्यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी एक प्रसंग सांगितला होता. त्यात ते म्हणाले होते की वीर सावरकर आणि त्यांचे काही मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते. हे पाहून वीर सावरकर यांना आनंद होत होता. हा उल्लेख सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. वीर सावरकर यांनी असं कुठलंही पुस्तक लिहिलेलं नाही. वीर सावरकर मुस्लिम समुदायाचा तिरस्कार करणारे किंवा मॉब लिंचर होते अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे मी हा खटला २०२३ मध्ये दाखल केला आहे, असं सात्यकी सावरकर यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसची नीती ही लांगुलचालनाचीच राहिली आहे-सात्यकी सावरकर
सात्यकी सावरकर पुढे म्हणाले, लांगुलचालनचं म्हणाल तर काँग्रेसची नीती ही स्वातंत्र्य संग्रामातही लांगुलचालनाचीच होती. कारण मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगने वंदे मातरम अर्धवट करण्याची मागणी केली होती आणि ती काँग्रेसने मान्य केली होती. शाह बानो प्रकरण असो किंवा इतर प्रकरणं असोत काँग्रेसने कायम शरणागतीच पत्करली आहे. वीर सावरकरांचं हे म्हणणं होतं की देशात म्हणजेच आपल्या मातीत जो माणूस जन्माला आला आहे, त्याच्यासाठी कुठलंही कम्युनिल अवॉर्ड नको. तो आपल्या स्वमताने स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होईल असंही त्यांनी म्हटलं होतं. असं सात्यकी सावरकर म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबुब शेख यांनी काय म्हटलं आहे?
चला एक गोष्ट चांगली झाली की राहुल गांधींमुळे वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांना म्हणावं लागलं की वीर सावरकर यांनी मुस्लिमांचा तिरस्कार केला नाही. आता माझं म्हणणं आहे की जे वीर सावकरांच्या विचारांवर चालणारे आम्ही आहोत असं सांगतात त्यांनी सात्यकी सावरकर यांचं म्हणणं ऐकून तसं वागलं पाहिजे. मुस्लिम समुदायला शिव्या देण्याचं काम त्यांनी करु नये. वीर सावरकर यांना जे मानतात त्यांनी सावरकरांचं नाव घेऊन मुस्लिमांना शिव्या देऊ नये नावं ठेवू नये.
