काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी साहिल वाकोडे याच्या आई-वडिलांशी फोन वरुन संवाद साधला आहे. आयआयटी मुंबईतील साहिलच्या मृत्यूनंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशावेळी राहुल गांधींनी वाकोडे कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना साहिलला न्याय मिळवून देण्यासाठीच्या लढाईत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. राहुल गांधींनी गुरुवारी व्हिडीओ कॉलद्वारे वाकोडे कुटुबीयांशी १७ मिनिटे संवाद साधल्याची माहिती काँग्रेसने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

राहुल गांधींनी व्हिडीओ कॉलवरुन साधला संवाद

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी साहिल वाकोडेचे आई-वडील रविंद्र आणि सोनाली वाकोडे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. साहिलचे आई-वडील वाशिम जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांना राहुल गांधींचा फोन आला अशी माहिती समोर आली आहे. १७ मिनिटांच्या व्हिडीओ कॉलमध्ये राहुल गांधींनी साहिलच्या पालकांना धीर दिला. तसेच, या लढाईत आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.

पालकांचे आजपासून उपोषण

राहुल गांधींनी फोन केला त्यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिंब आणि महाराष्ट्राचे प्रमुख शिवराज मोरे साहिल वाकोडे यांच्या आई-वडिलांबरोबर उपस्थित होते. दरम्यान, सहिलच्या आई-वडिलांनी आज सकाळी ११ पासून आयआयटी मुंबईच्या गेट समोर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, साहिलच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्वतंत्र तपासाची मागणी जोर धरु लागली आहे. साहिलच्या पालकांनी मुलाला जातीय भेदभाव आणि मनस्ताप झाल्याचा आरोप केला असून, जबाबदार असणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

आयआयटीने पुन्हा व्यक्त केली दिलगिरी

दरम्यान आयआयटी मुंबईने २१ सप्टेंबर २०२६ रोजी केलेली पोस्ट आज पुन्हा शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पूर्वीच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, “या घटनेशी संबंधित तपशील आणि घडामोडींचा तपास सुरु आहे. तपासाच्या पार्श्वभूमीवर तपशील मांडणे अयोग्य ठरले असते,” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

गुन्हा दाखल, तपास सुरु

आयआयटी मुंबईत बी-टेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या साहिलाचा मृतदेह १८ सप्टेंबर रोजी वसतिगृहात आढळून आला होता. साहिलने सत्र परीक्षेत चॅट जीपीटीचा वापर केल्याचा आरोप केला जात असून, त्याला फोन वापरताना पकडल्यानंतर काही तासांनी ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. यानंतर साहिलला कथितपणे प्राध्यपकांनी परीक्षागृहातून बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपास करत आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.