Rahul Narwekar Viral Video : अलिबाग येथील म्हात्रोळी गावात जमिनीच्या वादातून हाणामारी झाली असून त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी केली. दरम्यान, याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या हाणीमारीचा संबंध थेट राहुल नार्वेकरांशी जोडला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही हा व्हिडिओ पोस्ट करून राहुल नार्वेकरांवर टीका केली. दरम्यान, याप्रकरणी चर्चा सुरू झाल्याने आता थेट राहुल नार्वेकरांनीच याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांची बाजू मांडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये राहुल नार्वेकर दिसत आहेत. घरात कोणी नसताना राहुल नार्वेकर अधिकाऱ्यांसह जमिनीची मोजणी करायला गेल्याने तिथे गोंधळ निर्माण झाला. यातून हाणामारी झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
राहुल नार्वेकरांनी दिलं स्पष्टीकरण
“आज सोशल मीडियावर माझ्याबाबत प्रसारित होत असलेल्या व्हिडिओ संदर्भात मी सत्य परिस्थिती स्पष्ट करू इच्छितो. मी परवा माझ्या शेतजमीनिवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेलो. सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण माझे नाव त्या घटनेशी जोडू नये, ही नम्र विनंती.”
गावकऱ्याने काय सांगितलं?
दरम्यान, या घटनेतील स्थानिकांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राहुल नार्वेकरांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो माझा आणि माझ्या सुनेतील भांडणाचा आहे. यात राहुल नार्वेकरांचा काहीही संबंध नाही. ते इथून जात असतानाच आमच्यात वाद झाले. उलट आमच्यातील आपसांत मिटवा, असं राहुल नार्वेकरांनी सांगितलं”, अशी प्रतिक्रिया त्या जागेचे मालक रमेश पाटील यांनी दिली.
संजय राऊतांनी काय आरोप केले होते?
“सरकारी मोजणी करण्याकरता अधिकारी हे महाशय गेले, जमिनीचे मोजामाप करायला. ही जागा गुजरातच्या एका गुंतवणूकदाराच्या नजरेत भरली. त्या जागेचे मालक घरात नसताना, त्यांच्या घरी एक लग्न समारंभ होता. ते घरात नाहीत हे पाहून हे अधिकरी त्यांच्या जमिनीवर गेले. मोजणी सुरू केली. त्यांना जेव्हा कळलं की मोजमाप सुरू झाली तेव्हा ते कुटुंब तिथे आले. त्या माऊलींनी अनेकांच्या कानफाट्यात मारल्या, तोही व्हिडिओ समोर येईल. या गुजरातच्या टोलधाडी, भाजपाचे पुढारी, सत्तेवरची मंत्री आणत आहेत. कोकणचं स्मशान करत आहेत. त्याचा भडका या म्हात्रोळी गावात उडाला. मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो की त्यांनी या महाराष्ट्राला दाखवलं”, असं संजय राऊत म्हणाले. तसंच, अलिबाग मराठी माणसांचं राहिलं नाही, गुजरातच्या लोकांनी अलिबागसारख्या शांत सुंदर शहराचा ताबा घेतला आहे, असंही ते म्हणाले.

