अहिल्यानगर : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे अपक्ष की राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) चीन्हावर निवडणूक लढवणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तनपुरे यांच्या अपक्ष उमेदवारीचीच अधीक शक्यता व्यक्त केली जाते. राहुरी मतदारसंघाची जागा भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप कोणत्याही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ एप्रिल आहे.
भाजपने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव तथा भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी व बारामती पोटनिवडणुकीचे जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न आहेत, त्या दृष्टीने सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, मात्र निवडणूक लादल्यास भाजप निवडणूक लढवेल, असे स्पष्ट केले होते मात्र अद्याप निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा झालेली नाही.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे भाजप प्रवेशाच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी तनपुरे यांनी मतदारसंघात जन आशिर्वाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेत त्यांनी शरद पवार गटाचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह कोठेही झळकवले नाही. शिवाय भगवे उपरणे, भगवी टोपी घालून त्यांनी यात्रा काढली.
सन २०२४ मधील राहुरीची सार्वत्रिक निवडणुकी तनपुरे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र त्यांना यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर तसेच हिंदूत्ववादी मते आकर्षित करण्यासाठी ते अपक्ष उमेदवारी दाखल करतील असे त्यांचे समर्थक सांगतात. तनपुरे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यास महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व ठाकरे गटाची भूमिका काय असेल हे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी मात्र प्राजक्त तनपुरे हे पक्ष चिन्हावरच निवडणूक लढवतील असा दावा केला आहे.
पक्षाने संधी दिल्याने वडिलांची आठवण – अक्षय कर्डिले
भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनाच भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना अक्षय कर्डिले म्हणाले, पक्षाने आपल्याला संधी दिली याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच सर्व वरिष्ठांचे व कार्यकर्त्यांचे आभार. वडिलांनी गेल्या ३० वर्षात जो परिवार जमवला, तो माझ्या पाठीशी भविष्यातही उभा राहील. वडिलांची कमी हा परिवार जाणवू देणार नाही. पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकल्याने मला वडिलांची आठवण होत आहे. वडिलांनी गेली तीस वर्षे सातत्याने जनतेचे प्रश्न मार्गी लावले. त्यापेक्षा मी अधिक चांगले काम करू शकलो तरच वडिलांना आनंद होणार आहे.
