अक्षय कर्डिले, गोविंद मोकाटे, संतोष चोळके यांच्यामध्ये प्रमुख लढत
अहिल्यानगर:राहुरी विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार का, याची उत्सुकता असतानाच आता निवडणुकीच्या रिंगणात ७ उमेदवार राहिले आहेत. भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गोविंद मोकाटे व वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके या तिघांसह चार अपक्ष असे ७ उमेदवार आहेत. ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीसह बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करू असे जाहीर केले होते. तसेच त्यांच्या प्रयत्नातून शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक बिनविरोध होते काय, अशी चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही राहुरीमध्ये आज, गुरुवारी धाव घेतल्याचे मानले जाते.
आज राहुरीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात अक्षय कर्डिले (भाजप), गोविंद मोकाटे (शरद पवार गट), संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी) या प्रमूख राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे (ठाकरे गटाचे बंडखोर), सुरेश लांबे, महेश हापसे, अथर्व म्हसे असे एकूण सात उमेदवार राहिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांच्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांनी संतोष चोळके यांच्यावर भिस्त सोपवली. अनिल जाधव यांनी अर्ज मागे घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दूरध्वनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी बंद खोलीत चर्चा करून त्यांना उमेदवारी करू नये अशी घातलेली गळ, यामुळे तनपुरेंनी अखेर उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार गटाने ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले गोविंद मोकाटे यांना पक्षाचिन्हासाठी ‘एबी फॉर्म’ दिला. त्यामुळे मोकाटे हे आता राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले आहेत.
प्राजक्त तनपुरे यांनी विनंती मान्य केल्याचा आनंद- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी शिर्डीमध्ये येऊन नंतर आष्टी (बीड) येथील संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहास उपस्थित राहाण्यासाठी रवाना झाले. या सप्ताहाच्या ठिकाणी बोलताना फडणवीस यांनी प्राजक्त तनपुरे यांनी आपली, उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची विनंती मान्य केली, याचा आनंद झाल्याची सांगितले.
मी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली- रावसाहेब खेवरे
ठाकरे गटाचे बंडखोर रावसाहेब खेवरे यांनी आपली उमेदवारी मागील भूमिका स्पष्ट करताना ‘लोकसत्ता’ला सांगितले की, महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाचे माजी आमदार तनपुरे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता ज्यांचा पक्षाशी संबंध नाही, ज्याचा तालुक्याशी संबंध नाही, अशाला उमेदवारी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी तनपुरे उमेदवार असतील असे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने आपल्याला उमेदवारी देऊ केली होती, मात्र मी शिवसेनेशी प्रामाणिक असल्याने पक्ष सोडण्याचे कारण नव्हते त्यामुळेच मी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. माझी उमेदवारी ही तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यामुळे माझी उमेदवारी बंडखोरी ठरत नाही.
