अहिल्यानगर:राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी यंदा होणारी दुसरी पोटनिवडणूक आहे. २८ वर्षांपूर्वी, १९९८ मध्येही राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्या पोटनिवडणुकीत एकदा नव्हे तर दोनवेळा फेरममतमोजणी आणि दुसऱ्यांदा फेरमतमोणी होताना काही मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित होऊन फेरमतमोणी ठप्प होण्याचा थरारक प्रसंगही घडून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर कदम अवघ्या २३ मतांनी विजयी झाले आणि ते साखर कारखानदारीच्या पट्ट्यातून निवडूण येणारे भाजपचे पहिले आमदार ठरले होते.

आताही राहूरीसाठी पोटनिवडणूक होत आहे. कोणत्याही मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होण्याचा प्रसंग तसा अपवादात्मकच. २८ वर्षांपूर्वी चंद्रशेखर कदम प्रथमच आमदार झाले. त्यांनी या पोटनिवडणुकीच्या आणि मतमोजणीतील थरारक आठवणींना उजाळा दिला. कदम कुटुंबीय हे तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान. चंद्रशेखर यांचे वडील अण्णासाहेब कदम यांना मानणारा वर्गही राहुरीमध्ये मोठा होता.

अटलबिहारी वाजपेय यांचे केंद्रातील सरकार अवघ्या एक मताने कोसळले आणि लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. राहुरीचे आमदार प्रसाद तनपुरे यांना काँग्रेसचे पक्षाने कोपरगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली. तनपुरे भाजपचे खासदार भीमराव बडदे यांचा पराभव करून विजयी झाले आणि त्यांनी राहुरीच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राहुरी विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. महाराष्ट्रात काँग्रेसने पाच आमदारांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली होती. त्यामुळे राहुरीसह पाच ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या.

भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांच्या आग्रहामुळे चंद्रशेखर कदम राहुरीतून निवडणूक लढवण्यास तयार झाले. त्यावेळी कदम यांचे देवळाली प्रवरा गाव राहुरी मतदारसंघात होते (सध्या ते श्रीरामपूर मतदारसंघात आहे). तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही प्रचार सभा घेतली. मुंडे यांनी अण्णासाहेब पाटील यांचा संदर्भ देत मतदारांना भावनिक आवाहन केले.

या पोटनिवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर कदम, काँग्रेसचे रामदास धुमाळ, जनता दलाचे लक्ष्मण धागुडे, प्रमुख अपक्ष पंढरीनाथ पवार यांच्यासह एकूण ७ उमेदवार रिंगणात होते. पंढरीनाथ पवार हे साखर कारखान्याचे संचालक होते.

पोटनिवडणूक असल्याने अवघे ५४.३ टक्के मतदान झाले. मतमोजणीत ‘काटे की टक्कर’ स्पष्ट झाली. ती पूर्ण झाली, तेव्हा चंद्रशेखर कदम अवघ्या ४ मतांनी पराभूत होणार होते. त्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला. या फेरमतमोजणीत त्यांची २० मते वाढली.

त्यामुळे कदम १६ मतांनी विजयी होणार होते. त्यामुळे रामदास धुमाळ यांनीही फेरमतमोजणीचा अर्ज दिला. त्यात चंद्रशेखर कदम यांची आणखी ७ मते वाढली आणि कदम एकूण २३ मतांनी विजयी झाले. चार मतांनी विजयी झाल्याचे समजून रामदास धुमाळ यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. परंतु फेरमतमोजणीच्या अर्जामुळे धुमाळ परत मतमोजणी ठिकाणी आले. या फेरमतमोजणीवरून तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विजयकुमार यांच्याशी त्यांचा वादही झाला. मराठी भाषेच्या अडचणीमुळे धुमाळ काय म्हणत आहेत हे विजयकुमार यांना स्पष्टपणे समजत नव्हते. इतर निवडणूक कर्मचाऱ्यांमार्फत ते समजून घेत होते.

दुसऱ्यांदा फेरमतमोजणी सुरू असतानाच काही मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता, तो लगेच सुरळीतही झाला, मात्र या घटनेने बराच गदारोळ निर्माण केला होता. चंद्रशेखर कदम सांगतात, मतमोजणी वेळी सुमारे ४ हजारावर मते बाद ठरवली दिली होती. भाजप कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे नजरचुकीने बाद ठरवलेली मते नंतर मोजणीत घेण्यात आली. त्यामुळे ७ मते वाढली.

सन १९९८ च्या पोटनिवडणुकीची आकडेवारी

मतदार संख्या १ लाख ६३ हजार ४४०. झालेले मतदान ८८ हजार ८२९ (५४.३ टक्के )

मिळालेली मते:चंद्रशेखर कदम ३४ हजार ५२३. रामदास धुमाळ ३४ हजार ५००. पंढरीनाथ पवार १५०५९.

विजयाचा खोखो

सन २०१४ च्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला. त्यानंतर सन २०१९ च्या निवडणुकीत तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला. पुन्हा २०२४ मध्ये कर्डिले यांनी तनपुरे यांचा पराभव केला. अशीच लढत तनपुरे व कदम कुटुंबीयांमध्ये रंगली. १९९८ च्या पोटनिवडणुकीत चंद्रशेखर कदम विजयी झाल्यानंतर १९९९ च्या निवडणुकीत प्राजक्त यांचे वडील प्रसाद तनपुरे यांनी चंद्रशेखर कदम यांचा अवघ्या ६०० मतांनी पराभव केला. त्यानंतरच्या २००४ च्या निवडणुकीत मात्र कदम यांनी तनपुरे यांचा १० हजारावर मतांनी पराभव केला.

पोटनिवडणुकीचा न घडलेला योग

वयाच्या ६० नंतर निवडणूक न लढवण्याचा आईला व सूर्यभान वहाडणे यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी चंद्रशेखर कदम यांनी पुन्हा निवडणूक लढवली नाही. यंदाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारीसाठी चंद्रशेखर कदम हे चिरंजीव व देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी आग्रही होते. तसे झाले असते तर वडिलांप्रमाणेच सत्यजित कदम यांचाही पोटनिवडणुकीतून विधानसभेत प्रवेश झाला असता.