अहिल्यानगर: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दुपारी १ वाजेपर्यंत ३ लाख ३३ हजार ५४५ मतदारांपैकी ९८ हजार ७४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २९.६० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपकुमार यादव यांनी दिली. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, मात्र मतदान सुरू होण्यापूर्वी सकाळी दगडवाडी मतदान केंद्रावरील १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्र ‘मॉकपोल’ वेळी बंद पडले होते. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत वांबोरीतील मतदान केंद्रावरील १ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व २ व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडल्याने ते बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक यंत्रणेकडून उपलब्ध झाली.मतदानाला वाढत्या उन्हाचा फटका बसताना दिसत आहे. दुपारी बारानंतर मतदान केंद्रांवर अगदी तुरळ मतदान होताना आढळत आहे.