अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून आता महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटात वादंगाची चिन्हे निर्माण झाली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि. ६) अंतिम दिवस असतानाच ही चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देईल असे स्पष्ट केले तर ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण उमेदवारी करणार असल्याचे सांगत याची पूर्वकल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचे स्पष्ट केले.

विशेष म्हणजे रावसाहेब खेवरे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री थोरात यांची आज, शुक्रवारी अहिल्यानगरमध्ये भेट घेऊन आपण उमेदवारी करणार असल्याची माहितीही दिली आहे. त्यावर थोरात यांनी आपण यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू असेही स्पष्ट केले.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने यापूर्वीच दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राहुरीच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लढत दिली होती. मात्र आता तनपुरे राष्ट्रवादीमध्ये असले तरी ते राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी ते अपक्ष उमेदवारी करण्याच्या मनस्थितीत आहेत.

निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तनपुरे यांनी मतदारसंघातून यात्रा काढली. या यात्रेतही त्यांनी कोठे राष्ट्रवादीचे पक्ष चिन्ह झळकवले नाही तसेच अलीकडच्या काळात ते भगवी टोपी, भगवे उपरणं परिधान करून नागरिकांशी संपर्क करताना दिसतात. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी करतील असे त्यांचे समर्थक सांगतात.

काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानानिमित्त माजी मंत्री बाळासाहेब थोरात आज नगरमध्ये होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राहुरी निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देईल असे सांगितले. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आमच्या संपर्कात नाहीत, असे सांगताना थोरात यांनी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचा व तो निवडूनही येईल असाही दावा केला आहे.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारची आहे. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यावरून शेवटच्या टप्प्यात वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाने काँग्रेसला वरिष्ठ पातळीवर राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे आता शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि ठाकरे गटातही उमेदवार शोधण्यासाठी धावपळ उडालेली आहे.

काँग्रेसकडून वकील अथर्व म्हसे यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे. म्हसे यांनी आज यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. मात्र कट्टर शिवसैनिक असलेले ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. गेले ३० वर्ष आपण पक्षाचे काम करत आहोत, आजपर्यंत आपल्याला संधी मिळाली नाही, आता आपल्याला संधी दिसते आहे, त्यामुळे आपण उमेदवारी करणार असल्याची त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी व बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न राहतील, असे त्यासाठी आपण सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे काही दिवसांपूर्वी राहुरीमध्येच बोलताना सांगितले होते. मात्र राहुरीची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आता धूसर बनू लागली आहेत. अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ९ एप्रिलपर्यंत असल्याने अखेरच्या क्षणीही वेगळ्या घडामोडी होऊ शकतात.