अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होत असली तरी, निवडणुकीत उमेदवार नसलेले माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून खिल्ली उडवली गेली होती, तेच विखे आता तनपुरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळू लागले आहेत. उमेदवारी न करणाऱ्या तनपुरे यांनी आपली भूमिका पूरेशी स्पष्ट केली नसल्याने विखे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांसह आपण तनपुरे यांची पुन्हा भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करून भाजपला अनुकूल भूमिका घेतली असली तरी त्यांनी उघडपणे भाजपबरोबर जाणे टाळले आहे. तनपुरे यांनी आपण अद्याप महाविकास आघाडीमध्येच आहोत असे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. तनपुरे यांचे समर्थक असलेले प्रमुख पदाधिकारी हे ‘थांबा आणि पहा’च्या भूमिकेत आहेत. ते अद्याप कोणत्याच उमेदवाराच्या बाजूने सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळेच ते तनपुरे यांच्याकडून मिळणारे सूचनेच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते.
तनपुरे यांचा राहुरीसह पाथर्डी व नगर तालुक्यातही कार्यकर्त्यांचा संच आहे. राहुरी तालुक्यातील नगरपालिका, बाजार समिती, साखर कारखाना अशा प्रमुख संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. त्यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे व आजोबा डॉ. बाबुराव तनपुरे यांनी मतदारसंघावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले. त्यामुळे तनपुरे कुटुंबियांना मानणाऱ्यांची संख्या राहुरी मध्ये मोठी आहे. या सर्वच संस्थांमधील प्रमुख पदाधिकारी तनपुरे यांच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत. काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचारात सक्रिय होऊ लागले होते, मात्र त्यांना थांबण्याची सूचना मिळाल्याचे समजले.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी सुजय विखे यांनी ‘भाजपची गाडी आता भरलेली आहे’, असे वक्तव्य केले होते. आता विखे यांनी प्रचार सभेतून तनपुरे यांचे आभार मानण्यास सुरुवात केली आहे. तनपुरे व त्यांच्या समर्थकांनी अद्याप उघडपणे भूमिका स्पष्ट न केल्याने विखे यांनी प्रचार सभेतून तनपुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांची अवहेलना होईल अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेऊ नये, असेही आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही महिन्यात राहुरीमध्ये सर्वत्र कमळ फुललेले दिसेल, कोणत्या बांधावर गेलं तरी कमळ फुललेले दिसेल, राहुरीला तीन दादा मिळतील (सुजयदादा, अक्षयदादा व प्राजक्तदादा) असे ते सांगू लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर तनपुरे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपली भूमिका स्पष्ट करतील असे दिसते. दोन दिवसांपूर्वी विखे यांनी राहुरीमध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राहुरीमध्ये येणार आहेत, त्यावेळी चव्हाण व आपण तनपुरे यांची भेट घेऊ असेही सांगितले आहे. त्यामुळेच पोटनिवडणुकीत तनपुरे यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. पोटनिवडणुकीत चुरस नसल्याने व उन्हाचा तडाखा यामुळे मतदान कमी होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत तनपुरे व त्यांचे समर्थक आपल्याबरोबर असावेत असेही भाजपला वाटू लागले आहे.
