अहिल्यानगर : महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये असलेला विसंवाद राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या पथ्यावर पडला. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उमेदवारीवरून दोलायमान झालेल्या महाविकास आघाडीची अवस्था अशरश: तोंडघशी पडल्यासारखी झाली. महाविकास आघाडीला अखेर एका अपक्ष उमेदवाराला आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्याची वेळ आली.

राज्यात राहुरी व बारामती या दोन मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीमध्ये या दोन्ही जागा शरद पवार गटाकडे आहेत. या पक्षाने ज्याप्रमाणे बारामतीची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले, तशी भूमिका राहुरी पोटनिवडणुकीबाबत घेतली नाही. राहुरीची जागा लढवणार असेच सांगितले जात होते. दोन जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पक्षाने दोन वेगवेगळ्या भूमिका ठेवल्या.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राहुरीतील जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वी झालेल्या चार सार्वत्रिक निवडणुका राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरे अशाच रंगल्या. भाजपने सहानुभूतीच्या लाटेचा आधार घेत कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वी तनपुरे यांनी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली होती.

यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार होते. परंतु त्यांनी पूर्वतयारीतून राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह हटवले आणि भगवी टोपी, भगवे उपरणे परिधान करत संपर्क यात्रा सुरू केली. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या उमेदवारीपासून दूर होत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर ते अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत होते.

तनपुरे अपक्ष उमेदवार असण्याची शक्यता लक्षात गृहीत धरून अखेरच्या क्षणी सावध झालेल्या आघाडीतील काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू करून रस्सीखेच सुरू केली. मात्र हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात संघटना बांधणीच्या पातळीवर सध्या विस्कळीत अवस्थेत गेलेले आहेत. राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांनीही त्यांच्या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असूनही फारसे लक्ष घातले नाही.

काँग्रेस व ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी दावा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीने तनपुरे अपक्ष उमेदवार असतील तर आम्ही पर्यायी उमेदवार देऊ, अशी भूमिका घेतली. पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाची एकही बैठक स्थानिक पातळीवर झाली नाही. तनपुरे वगळता या तिन्ही पक्षांकडे राहुरी मतदारसंघात सक्षम उमेदवाराची वाणवाच होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अखेरच्या क्षणापर्यंत प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी करणार की नाही याबद्दलची भूमिका संदिग्ध ठेवली. त्यामुळे महाविकास आघाडीही बेसावध राहिली. याचा फायदा भाजपने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी थेट तनपुरे यांच्याशी संपर्क साधत त्यांनी उमेदवारी दाखल करू नये यासाठी गळ घातली. तनपुरे यांच्यापुढेही अन्य पर्याय नव्हता.

तनपुरे सध्या विविध कारणांनी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला सकारात्मक शब्द मिळाल्याने आपण उमेदवारी करत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बंद खोलीत नेमकी काय चर्चा झाली हे फडणवीस, तनपुरे, चव्हाण, विखे यांच्याशिवाय अन्य लोकांना माहिती नाही.

प्राजक्त तनपुरे उमेदवार नसणार हे अखेरच्या क्षणी स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्वीच अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या गोविंद मोकाटे यांना अधिकृत उमेदवारी दिली. राहुरीतील जागेसाठी आघाडीत रस्सीखेच करणारे काँग्रेस व ठाकरे गट यांनी प्रत्यक्षात उमेदवार दिलाच नाही. राष्ट्रवादीने पुढे केलेल्याच अपक्ष उमेदवाराला त्यांनी आघाडीचा उमेदवार मानले आहे.