अहिल्यानगर : राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक अपेक्षेप्रमाणे एकतर्फीच झाली आणि चुरस नसलेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजी कर्डिले लाखावर मताधिक्याने विजयी झाले. एका अर्थाने ही ‘लुटूपुटू’ची लढाई होती. निवडणूक एकतर्फी व्हावी यासाठी भाजपने रणनीती आखली. त्याला यश आले. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले होते. ज्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय जाहीर केला, ते विकासाचे मुद्दे मात्र भाजपने प्रचारात न आणता सहानुभूतीच्या लाटेचा आधार घेतला.
सन २०२४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने पोटनिवडणूक झाली. त्या वेळी कर्डिले ३५ हजारांवर मतांनी विजयी झाले होते. स्व. कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय यांना उमेदवारी देत भाजपने सहानुभूतीच्या मुद्द्यावर निवडणूक नेली. अक्षय यांची ही पहिलीच निवडणूक. विजयाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवली गेली होती. त्यांच्या सोबतीला माजी खासदार सुजय विखे व अक्षय यांचे मेहुणे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप हेही मदतीसाठी मैदानात उतरले होते.
राहुरीची ही निवडणूक प्रथमच अनेक वर्षांनंतर तनपुरे कुटुंबीयांचा सहभाग नसलेली ठरली. यापूर्वीच्या निवडणुकीत अनेकदा तनपुरे विरुद्ध कर्डिले अशी लढत झाली. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीत उमेदवारी न करण्याचा निर्णय ऐनवेळी जाहीर केला. त्याला अनेक कंगोरे आहेत. मतदानाच्या एक दिवस अगोदर ते ‘ईडी’च्या चौकशी फेऱ्यातून मुक्त झाले, हा त्यातील प्रमुख. त्यामुळे अक्षय कर्डिले यांच्याविरोधात सक्षम उमेदवारच रिंगणात नव्हता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या धक्क्यातून महाविकास आघाडी शेवटपर्यंत सावरलीच नाही. यामुळे अगोदरच अशक्त आणि विस्कळीत असलेली ही आघाडी सक्षम उमेदवार देऊ शकली नाही.
दोन दिवस आधीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले गोविंद मोकाटे यांना ऐनवेळी शरद पवार गटाला आपला बदली उमेदवार म्हणून जाहीर करावे लागले. प्रचारात महाविकास आघाडीचा एकसंघपणा दिसलाच नाही. उलट ठाकरे गटाचे रावसाहेब खेवरे यांनी बंडखोरी केली. शिवाय प्राजक्त तनपुरे यांचे बहुसंख्य समर्थक भाजपच्या बाजूने झुकले, त्याचा परिणाम दिसला. जिल्ह्यातील कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातही प्रचाराकडे फिरकले नाहीत. सत्ताधारी असलेला सर्वशक्तिमान भाजप एकीकडे आणि दुबळी, विस्कळीत महाविकास आघाडी दुसरीकडे अशी ही लढत होती.
राहुरी मतदारसंघात एकूण ३ लाख ३३ हजार ५२५ मतदार होते, त्यांपैकी केवळ ५५.८९ टक्के मतदान झाले. त्यातील दोन तृतीयांशपेक्षा अधिक म्हणजे १ लाख ४० हजारांवर मतदान अक्षय कर्डिले यांनी मिळवले. यापूर्वी जिल्ह्यात असे एकतर्फी चित्र कोणत्याच निवडणुकीत दिसले नव्हते. सहानुभूतीच्या लाटेचा हा परिणाम दिसतो.
जिल्हा भाजपमय
या विजयाने भाजपचे आता जिल्ह्यात एकूण सहा आमदार झाले आहेत. एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा नंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेला होता. तो आता हिंदुत्ववादाकडे झुकलेला दिसू लागला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे दोन्ही आमदारही मूळचे भाजपचेच आहेत. कोपरगावचे विवेक कोल्हे यांची नुकतीच विधान परिषदेवर निवड झाली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचीही भूमिका भाजपला अनुकूल अशीच असते. त्यामुळे आता जिल्ह्यावर भाजपचे वर्चस्व निर्माण झाल्याचे मानले जाते. शरद पवार गटाचा एक व काँग्रेसचा एक आमदार केवळ जिल्ह्यात आहे. शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंकेवगळता इतर कोणीही जिल्ह्यात भाजपविरोधात आक्रमकता दाखवत नाही. राहुरीच्या पोटनिवडणुकीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पुढे ढकलली गेली होती. ती आता मार्गी लागेल, अशी चिन्हे आहेत.
