अहिल्यानगरः राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी आज, शनिवारी शांततेत मतदान झाले. एकूण ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक प्रशासनाने व्यक्त केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उद्या, रविवारी मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीत राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ, राजू शेटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व अमृत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली कारखाना बचाव कृती समिती असे तीन प्रमुख पॅनल निवडणुकीत उतरले होते. या तिन्ही पॅनल प्रमुखांनी मतदानानंतर विजयाचा दावा केला आहे. निवडणुकीत एकूण ५६ उमेदवार रिंगणात आहेत.

एकूण २१ हजार २८३ मतदारांपैकी १२ हजार ६६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीत मयत मतदारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. आज सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता. कारखाना कार्यस्थळावरील विद्यालयाच्या वर्गखोल्यांतून मतदान केंद्र होते. तेथे मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारखाना गेल्या चार वर्षांपासून बंद आहे तसेच जिल्हा बँकेने कर्जामुळे जप्तही केलेला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक होत आहे. सकाळपासूनच मतदारांच्या केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सुमारे सात वर्षांनंतर मतदारांना मतदानाची संधी मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडल्याने रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. जनसेवा व शेतकरी विकास मंडळाने मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती.