अहिल्यानगर : राहुरी पोटनिवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या अक्षय कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे संभाव्य लढतीमध्ये तनपुरे यांनी सोमवारी ऐनवेळी माघार घेतल्याने नाट्यमय वळण मिळाले. आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तनपुरे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
या नाट्यमय घडामोडींमुळे महाविकास आघाडीची मोठी नामुष्की झाली. अखेर या गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) अपक्ष उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या गळ्यात अधिकृत उमेदवारीची माळ घालावी लागली. दरम्यान भाजपकडून अक्षय कर्डिले यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आपला अर्ज दाखल केला. तनपुरे यांच्या माघारीमुळे कर्डिले यांच्या विरोधातील निवडणूक चुरस संपुष्टात आली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. भाजपकडून कर्डिले आणि विरोधी आघाडीकडून तनपुरे यांचे अर्ज दाखल होण्याची चर्चा होती. तनपुरे यांचा अर्ज अपक्ष की राष्ट्रवादीकडून याचा घोळ सुरू होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासून नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दूरध्वनीवरून त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री विखे राहुरीत दाखल झाले. त्यांनी थेट तनपुरे यांचे राहुरी शहरातील कार्यालय गाठले. तेथे त्यांची बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली. याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तनपुरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादानंतर तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन – तनपुरे
या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना तनपुरे यांनी मुख्यमंत्र्यांशी राहुरीच्या विकासावर चर्चा झाल्याचे सांगितले. लष्कराच्या सराव क्षेत्रातील (के. के. रेंज) ‘ॲम्युनेशन पार्क’साठी आणखी ७ हजार एकर जमीन संपादित होणार नाही. मुळा धरणातील गाळ उपसून अतिरिक्त ३.५ टीएमसी पाणी उपलब्ध केले जाईल, राहुरीतील रोजगारासाठी मोठा प्रकल्प उभारला जाईल, राहुरी नगरपालिकेला रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे तनपुरे यांनी या वेळी जाहीर केले. तनपुरेंच्या या माघारीनंतर भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण मंत्री विखे यांच्या समवेत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.
उमेदवारासाठी धावाधाव
दरम्यान तनपुरे यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीची मोठी नामुष्की झाली. आघाडीअंतर्गत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे (शरद पवार गट) आहे. यातच तनपुरे यांनी माघार घेतल्यामुळे कर्डिले यांच्या विरोधात उमेदवार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. उमेदवारासाठी धावाधाव सुरू असताना अखेर या गोंधळात शरद पवार गटाला अपक्ष उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या गळ्यात अधिकृत उमेदवारीची माळ घालावी लागली. त्यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादीकडे पक्ष निरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश काकडे यांनी केली. मोकाटे यांनी दोन दिवसांपूर्वीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मोकाटे हे पूर्वाश्रमीचे एकत्रित शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य आहेत.
