अहिल्यानगर : विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी, याबाबत पालकांना सतर्क करण्यासाठी राहुरी नगरपालिका आता सायरन वाजवणार आहे. रोज किमान दीड तास मोबाईलसह सर्व मनोरंजनाची माध्यमे बंद ठेवावीत, यासाठी हा सायरन वाजवला जाणार आहे. राहुरी नगरपालिकेने तसा ठरावच केला आहे. नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि ठराव करण्यात आला.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांना व कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नाही. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच कुटुंबातील आई, वडील, पत्नी व इतर नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी वेळ द्यायला हवा. या संकल्पनेतून नगरपालिकेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मोरे यांनी दिली.

सध्या मोबाईलचा अतिवापर, टीव्ही, विविध समाज माध्यमे व इतर व्यसनांच्या सवयी यामुळे तरुण पिढी बऱ्याच प्रमाणात भरकटलेली दिसते. पालक व मुलांमध्ये संवाद राहिला नाही. लहान मुलानां चांगले वाईट यातील फरक सांगायला व त्यांच्याजवळ बसायला कोणाला वेळ नाही. या सर्व गोष्टीला जबाबदार आपण स्वतः पालक आहोत. पालक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कि, आपल्याकडून या सवयीनां वेळीच आवर घातला पाहीजे, असे आवाहन राहुरी नगरपालिकेच्या सर्वसाधारण नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोरे यांनी मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.

नगरपालिका सायंकाळी ७ वा. सायरान वाजल्यानंतर सर्व पालकांनी आपल्या घरातील टिव्ही व इतर मनोरंजनांचे माध्यमे बंद करायची आहेत. यानंतर मुलांना आपल्या घरातच अभ्यासासाठी बसावयाचे आहे. आपण स्वतः घरात थांबुन पुस्तकाचे वाचन करणे, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, त्यांच्याशी संवाद साधणे कुटुंबाला वेळ देणे. अशा प्रकारे दीड तासानंतर ठिक रात्री ८.३० वा. दुसरा सायरान वाजल्या नंतर पुर्ववत आपल्या कामाला वेळ दिला तरी चालेल, यासाठी पूर्वसूचना सायरन वाजवून दिली जाणार आहे.

हा निर्णय कठोर वाटत असला तरी पुढच्या पिढीला घडविण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेण्याची आपल्यावर वेळ आली आहे. तरी सर्व पालक वर्ग या गोष्टीचा काटेकोर अवलंब करतील व पालिकेच्या निर्णयाला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा नगराध्यक्ष मोरे तसेच सर्व नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वीच राहुरी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यामध्ये माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीने वर्चस्व मिळवत सत्ता स्थापन केली.