अहिल्यानगर: भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज, रविवारी जाहीर केला. या निवडणुकीत भाजपकडून कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असली तरी त्यांच्या विरोधात माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार असतील की अन्य कोणत्या पक्षाचे याची संदिग्धता कायम आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुरी मतदारसंघासाठी आजपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती व राहुरी या दोन विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न असून त्याबाबत एकमताने निर्णय होण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे जाहीर केले आहे. त्याचबरोबर निवडणूक लादल्यास आम्ही लढण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेला मतदारसंघ आहे. या जागेवर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याने बारामतीबाबत जो निर्णय होईल, तोच निर्णय राहुरीसाठी लागू केला जाईल. त्यामुळेच बारामतीबरोबरच राहुरीची बिनविरोध होणार की तेथे निवडणूक होणार याकडे लक्ष लागलेले आहे.

यापूर्वी सन २०२४ मध्ये झालेल्या राहुरी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली होती. एकूण ३ लाख २५ हजार १६६ मतदारांपैकी २ लाख ४१ हजार ५०४ मतदारांनी (७४.२७ टक्के) मतदान केले. त्यामध्ये कर्डिले यांना १ लाख ३५ हजार ८५९ तर तनपुरे यांना १ लाख १ हजार ३७२ मते मिळाली. तनपुरे यांचा ३५ हजार ४८७ मतांनी पराभव झाला. त्यावेळी निवडणुकीत एकूण १३ उमेदवार होते. आता १ जानेवारी २०२६ या आर्हता दिनांकावर मतदान यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारसंख्येत सुमारे ८ हजारावर वाढ झालेली आहे. मतदानासाठी एकूण ३७४ मतदान केंद्र असतील.

यापूर्वी राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डिले विरुद्ध तनपुरे कुटुंबातील सदस्य यांच्यामध्येच पारंपरिक पद्धतीने निवडणुका लढल्या गेल्या. सन २०१९ मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला होता व महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्रिपद ही मिळवले. प्राजक्ता तनपुरे हे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. राहुरीत दुहेरी लढतीचा फायदा तनपुरे यांना तर तिहेरी तिचा फायदा कर्डिले यांना मिळाल्याचे चित्र आहे.

पाच महिन्यांपूर्वी शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. कर्डिले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री विखे यांनी अक्षय कर्डिले यांना पाठबळ देण्याचे जाहीर केले होते. मात्र माजी खासदार सुजय विखे यांनी पोटनिवडणुकीसाठी झालेल्या सर्वेक्षणात माझ्या नावाला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाल्याचा दावा केल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे. प्राजक्त तनपुरे यांनी गेल्या काही दिवसात केलेली वक्तव्ये, पेहरावात आणलेला भगवेपणा यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल चर्चा सुरू झाली होती. त्यातूनच त्यांनी मध्यंतरी बोलताना उमेदवारी करणार परंतु कोणत्या पक्षाकडून हे स्पष्ट नाही, असे सांगितले होते, त्यातूनच त्यांच्या भूमिकेबद्दल संदिग्धता निर्माण झाली आहे.