बाजारात आंबा मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आला असला तरी तो पिकविण्यासाठी कार्बोनेटचा वापर केला जात आहे. मानवी आरोग्याला ते घातक असल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्याविरुद्ध मोहीम उघडली असून येथील एका आंबा विक्रेत्यावर छापा टाकला. या कारवाईनंतर शुक्रवारी बाजारातून रसायनाने पिकविलेला आंबा गायब झाला होता.
केळी, आंबा व अन्य फळे ही कार्बोनेटचा तसेच रसायनांचा वापर करून पिकविली जातात. दोन वर्षांपूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने विक्रेत्यावर कारवाई केली होती. त्यानंतर शहरात रायपिंग चेंबर उभारण्यात आले. त्याचा वापर करून फळे पिकविली जात होती. पण गेल्या काही दिवसांपासून पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कार्बोनेटचा वापर करून पिकविलेली फळे बाजारात विक्रीसाठी आली होती. यासंदर्भात मोठय़ा प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन आज कारवाई करण्यात आली.
सहायक आयुक्त का. सु. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार, किशोर बावीस्कर व प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने बाजार समितीत आंबा व्यापारी जमीर याकुब बागवान या व्यापाऱ्यावर आज छापा टाकला. या वेळी एक पांढऱ्या रंगाची पावडर आंबे पिकविण्यासाठी वापरली जात असल्याचे आढळून आले. ही पावडर जप्त करण्यात आली आहे. ती कार्बोनेट असावी, असा अंदाज आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ही पावडर तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. आज बागवान याच्याकडे सापडलेले १ हजार ७२६ किलो आंबे जप्त करून ते नगरपालिकेच्या कचरा डेपोत नष्ट करण्यात आले.