वाई : येस बँकेची हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफरप्रकरणी कपिल आणि धीरज वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील घरावर शनिवारी ‘सीबीआय’ने छापा टाकला. या वेळी कोटय़वधी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आल्याचे समजते.

 सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांसह शनिवारी दुपारी वाधवान याच्या बंगल्यावर हजर झाले. वाधवान यांच्या बंगल्यात कोटय़वधी रुपयांची परदेशी चित्रे,  झुंबर असून या आलिशान बंगल्यामध्ये व्यायामशाळा, तरणतलाव संगमरवराचे मंदिरदेखील आहे. हे सर्व साहित्य त्यांनी जप्त केले. याची किंमत कोटय़वधींची असल्याचे सांगण्यात येत आहे. हे साहित्य कुठून आले, कसे आणले याची शहानिशा सीबीआयचे अधिकारी करत आहेत.

महाबळेश्वर येथे पाच एकर परिसरात वाधवान याचा बंगला असून करोना टाळेबंदी वेळी ८ एप्रिल २०२० मध्ये वाधवान बंधूनी तत्कालीन प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन कुटुंबातील २१ लोकांसह महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. त्या वेळी  पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांचा ताबा ईडी आणि सीबीआयला दिला होता.