अलिबाग – एकेकाळी असाध्य रोग समजला जाणाऱ्या क्षयरोग (टीबी) आजाराविषयी आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. रायगड जिल्हा आरोग्य विभागाकडून टीबी पूर्णपणे हद्दपार करण्याच्या उद्देशाने विशेष अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत सक्रिय रुग्ण शोध, जनजागृती, वेळेवर निदान व संपूर्ण उपचार यावर विशेष भर दिला जात आहे. दरम्यान रायगड जिल्हयातील ४४४ ग्रामपंचायती टीबीमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
क्षयरोग म्हणजे हवेतून पसरणारा संसर्गजन्य आजार असून, तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो. त्याचबरोबर परंतु इतर अवयवांनाही त्याचा धोका होऊ शकतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांमुळे, तसेच विविध माध्यमांतून होणारी जनजागृती आणि उपचारामुळे आता हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. नियमित उपचार पूर्ण केल्याने अनेकांना या रोगापासून मुक्ती मिळाली आहे. सन 2025 मध्ये ४ हजार ३०८ रूग्ण आढळले त्यातील २ हजार १०२ रूग्णांनी टीबीवर मात केली आहे. तर १ हजार ७८८ जणांवर उपचार सुरू आहेत. यावर्षी (2026) आतापर्यंत ८७९ रूग्ण आढळले असून त्यातील ७६१ जणांवर उपचार सुरू आहेत.
या आजाराचे निर्मूलन पूर्णपणे करण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या आजारावर पूर्णपणे मोफत उपचारही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आरोग्य विभागाकडून गावोगावी करण्यात येत असलेल्या जनजागृतीला यश येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील एकूण ४४४ ग्रामपंचायती आतापर्यंत टीबीमुक्त झाल्या आहेत, तर काही होण्याच्या वाटेवर आहेत. या टीबीमुक्त ग्रामपंचायती आणि निक्षय मित्रांचा नुकताच जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
निक्षय मित्रांचे सहकार्य
क्षयरोग निर्मूलनाच्या या सरकारच्या उपक्रमात निक्षय मित्रांनीदेखील खारीचा वाटा उचलला असून त्यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. अनेक दाते, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष या उपक्रमासाठी मदत करीत असतात. यात रोख स्वरूपातील मदतीबरोबरच क्षयरूग्णांना अन्नधान्य, कडधान्ये, खाद्यतेल तसेच प्रथिनयुक्त पदार्थांचा पुरवठा करीत असतात. ज्यांना कुणाला अशा प्रकारची मदत करायची असेल ते निक्षय पोर्टलवर नोंदणी करू श्कतात.
तालुकावार टीबी मुक्त ग्रामपंचायती
अलिबाग – ५४, कर्जत – ३०, महाड – ६५, माणगाव – ३३, पेण – २१, पनवेल – ४१, रोहा – ३७, श्रीवर्धन- २४, उरण – २७, खालापूर – १८, पोलादपूर – २८, सुधागड – २४, मुरूड – १२ तळा – ६, म्हसळा – २७, एकूण – ४४४.
जिल्हा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत टीबीमुक्त रायगड जिल्हा करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा.– डॉ. प्राची नेहुलकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी, रायगड
