अलिबाग- रायगड जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लसीकरण सुसाट वेगाने सुरु झाले आहे. दिलासा देणारी बातमी म्हणजे जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र नागरीकांपैकी ८० टक्के जणांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३२ टक्के नागरीकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पोलादपूर आणि कर्जत तालुक्यात शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. तर पनवेल आणि तळा तालुक्यात लसीकरणाचे वेग अजूनही कमी आहे.

   रायगड जिल्ह्यात १८ वर्षावरील नागरीकांची लोकसंख्याही २१ लाख ९२ हजार ५३२ एवढी आहे. यापैकी यात १७ लाख ७२ हजार ८५८ जणांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ७ लाख १४ हजार २१६ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. म्हणजेच लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांसाठी ८०.८६ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस, तर ३२ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला आहे.

    या वर्षी १६ जानेवारीला जिल्ह्यात लसीकरणाला सुरवात झाली होती. सुरुवातीला लसींचा पुरवठा कमी होता. नागरिकांमध्ये लसींच्या कार्यक्षमतेबाबत साशंकता होती. सुरवातीला फक्त प्राधान्यक्रम प्राप्त शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मर्यादीत होते. नंतर मात्र टप्प्याटप्प्याने नागरीकांसाठी खुले होत गेले. सुरवातीला जेष्ठ नागरीक, त्यानंतर ४५ ते ६० या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १८ ते ४५ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. सुरुवातीला लसीकरणाचा वेग कमी होता. मात्र सप्टेंबर महिन्यापासून लसींचा पुरवठा सुरळीत झाल्याने लसीकरणाचा वेग वाढायला सुरवात झाली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात लसीकरण सुसाट वेगाने सुरु झाले आहे.   

    जिल्ह्यात पोलादपूर आणि कर्जत तालुक्यात लसीकरणास पात्र असलेल्या सर्व नागरीकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. महाड आणि पेण तालुक्यात ९० टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. खालापूर तालुक्यातही ८० टक्के पात्र लाभार्थ्यांना लसीचा पहीला डोस मिळाला आहे. अलिबाग आणि श्रीवर्धन तालुक्यात ७० टक्क्याहून अधिक पात्र लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. उरण, मुरुड, माणगाव, रोहा, सुधागड, म्हसळा तालुक्यात ६० टक्केहून अधिक लोकांनी लस घेतली आहे. मात्र पनवेल आणि तळा तालुक्यातील लसीकरण तुलनेत मागे पडल्याचे दिसून येत आहे. तळा येथे ५३ टक्के तर पनवेल येथे ४५ टक्के लोकांनी पहिला डोस मिळाला आहे. पनवेल मध्ये लोकसंख्येची घनता जास्त असल्याने तीथे लसीकरण धिम्या गतीने होत आहे. मात्र तळा तालुक्यात लोकसंख्या कमी असूनही जिल्ह्यातील इतर भागांच्या तुलनेत तेथील लसीकरण धिम्यागतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.  

    जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु झाले आहे. ज्या नागरीकांनी अद्यापही करोना प्रतिबंधक लस घेतली नाही. त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. 

   विशाल दौंडकर, तहसीलदार सामान्य प्रशासन रायगड