अलिबाग: तीन दिवस लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. हजारो पर्यटक अलिबाग, नागाव, मुरुड आणि काशिदच्या समुद्र किनाऱ्यांवर दाखल झाले होत आहेत. किनारयांवर मनसोक्‍त हुंदडत , मौजमजा करीत पर्यटक सुटीचा आनंद घेत आहेत.

शनिवार रविवारला लागून प्रजासत्ताक दिनाची सुटी आली. त्यामुळे पर्यटक घराबाहेर पडले आहेत. सलग तीन दिवस सुटी मिळाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच पुणे जिल्ह्यातील हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यामुळे अलिबाग, किहीम, आवास, सासवणे, वरसोली, आक्षी, नागाव, चौल, रेवदंडा, काशिद, नांदगाव, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगार आणि हरिहरेश्वर येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची भरती आल्याचे चित्र सर्वदूर पहायला मिळत होते.

पर्यटकांनी समुद्र स्नानाबरोबरच सागरी सफरीचा आनंद लुटला, एटीव्ही, बनाना राईड , बंपर राईड , जेट्स की यांचा अनुभव घेतला. बच्चे कंपनीने घोडसफारी आणि उंट सफारी केली. पर्यटकांचा ओघ वाढल्याने जिल्ह्यातील हॉटेल्स आणि लॉजेस पर्यटकांनी गजबजून गेले होते. त्यामुळे पर्यटनावर आधारित उद्योगांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून आहे. दिवाळीनंतर सुरू झालेला पर्यटन हंगाम अशा सलग सुटयांच्‍या काळात अधिकच बहरलेला पहायला मिळतो आहे.

दिवाळीच्‍या सुटीत आम्‍ही गावी गेलो होतो त्‍यामुळे बाहेर फिरायला जायला वेळ मिळाला नाही. आता सलग सुटया आल्‍याने मुलांना घेवून बाहेर पडलो आहोत. अलिबाग मुरूडमध्‍ये दोन दिवस मुक्‍काम करून परतणार आहोत. आमच्‍या मुलांनी सुदधा इथं खूप मज्‍जा केली, असे मुंबईहून आलेल्‍या रश्‍मी पिंपळे यांनी सांगितले.

सुट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव, इंदापूर, कोलाड इथं वाहतूक कोंडी झाली होती.तर वडखळ अलिबाग मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तासनतास या कोंडीत अडकलेले पर्यटक आणि वाहन चालक वैतागले होते.