अलिबाग- रायगड जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये बालकांना आता इंग्रजीचे धडे मिळणार आहे. मराठी भाषेबरोबरच आता इंग्रजी भाषेची तोंड ओळख बालकांना व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महिला व बाल विकास आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ३ हजार १६१ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यामध्ये दाखल होणाऱ्या बालकांना पोषण आहारा सोबत आता मराठी आणि इंगजी भाषांचे धडे दिले जाणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेनी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महिला व बाल विकास विभाग आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहेत. यासाठी निवृत्त शिक्षकांच्या सहकार्याने इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या माध्यमातून बालकांना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांची तोंड ओळख करून दिली जाणार आहे. पालकांचा इंग्रजी शाळाकडे असलेला ओढा वाढत आहे. मराठी शाळांमधील पटसंख्या घटते आहे. अशावेळी शाळाप्रमाणे अंगणवाड्यांचाही पट कमी होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यामध्ये इंग्रजी भाषेची तोंड ओळख बालकांना व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून सर्व अंगणवाड्यामध्ये इंग्रजी भाषेचे धडे दिले जातील. मधूकर पाटील, उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद