अलिबाग- रायगड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल २८ पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. वारंवार होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन समुद्र किनाऱ्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. निळाशार समुद्र, रुपेरी वाळू आणि नारळ पोफळीच्या बागा यांचे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना अप्रुप असते, त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक कोकण किनारपट्टीवरील विवीध समुद्र किनाऱ्यांवर दाखल होत असतात. यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतात.
मात्र बरेचदा उत्साहाच्या भरात पर्यटकांकडून स्थानिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते. समुद्रातील पाण्याच्या प्रवाहांचा त्यांना अंदाज नसतो. त्यामुळे पर्यटकांचे जीव धोक्यात येतात, आणि दुर्घटना घडतात. दिवेआगर येथे नुकताच आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल २८ जणांचा समुद्र किनाऱ्यांवर बडून मृत्यू झाला आहे. ज्यात २०२२ मधील ५, २०२३ मधील ७, २०२४ मधील ५, २०२५ मधील ११ तर २०२६ मधील १० जणांचा समावेश आहे.
अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील निरनिराळ्या समुद्र किनाऱ्यांवर या घटना घडल्या आहेत. मात्र ज्यास सर्वाधिक दुर्घटना या काशिद समुद्र किनाऱ्यावरील आहेत. त्यामुळे वारंवार दुर्घटना घडणारे समुद्र किनाऱे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित करण्याची मागणी केली जात आहे. मद्य प्राशन करून समुद्रात जाणे, स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे, पाण्यातील अंतरप्रवाहांची जाण नसणे, भरती ओहोटीच्या समुद्रातील पाण्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव नसणे आणि अतिउत्साह आणि बेफकरी, पोहाता न येणे यामुळे या दुर्घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर जीव रक्षकांची नियुक्ती करावी, समुद्रस्थानासाठी ठरावीक ठिकाण निश्चित करून तीथे सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, स्थानिक बचाव पथकांना बचाव साहीत्य उपलब्ध करून द्यावे आणि धोक्याची सूचना देणारे फलक लावावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या उपाययोजना…
दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यू नंतर समुद्र किनाऱ्यांवर रोबोटीक बोया उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरिहरेश्वर, नागाव आणि काशिद समुद्र किनाऱ्यांवर आधी रोबोटीक बोया उपलब्ध करून देण्यात आले होते. आता अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन नगरपालिकांना रोबोटीक बोया उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या काळात इतरही ठिकाणी हे रोबोटीक बोया तैनात केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. तर रायगड पोलीसांकडून सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी १७४ गृह रक्षक दलाचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
