अलिबाग– समाज माध्यमांवर अश्लील चित्रफीती आणि लहान मुलामुलींच्या शोषणाच्या चित्रफीती प्रसारीत करणे पाच जणांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या विरोधात रायगड जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी १६ ते २८ वयोगटातील आहेत.

अल्पवयीन मुलामुलींच्या लैंगिक शोषणाच्या चित्रफीती आणि छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारीत केली जात असल्याचे खात्रीशीर वृत्त रायगड पोलीसांना मिळाले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी या प्रकरणांचा तपास करण्याचे निर्देश सायबर पोलीसांना दिले होते. पोलीसांनी सायबर पेंट्रोलींग आणि तांत्रिक तपास करून पाच आरोपी निष्पन्न केले. त्यांच्याविरोधात आता मुरुड, रेवदंडा, दादर सागरी, खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाच दिवशी पाच ठिकाणी या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. भारतीय न्याय संहीता आणि बालकांचे लैंगिक अत्याचार आणि शोषणापासून संरक्षण अधिनियम त्याच बरोबर माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या विवीध कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यामुळे समाज माध्यमांवर अश्लील आणि बालकांच्या शोषणाच्या चित्रफीती आणि छायाचित्र प्रसारीत अथवा एकमेकांना पाठवत असाल तर जरा थांबा, ही चूक चांगलीच महागात पडू शकते, समाजमाध्यमांचा वापर करतांना काळजी घेणे गरजेचे आहे असा सूचक इशारा पोलीसांनी दिला आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडून असे गुन्हेगारी कार्य होत नाही ना याची खबरदारी बाळगण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

लहान मुलांच्या लैंगिक शोधणाची चित्रफीत तयार करणे, त्याचे मोबाईल फोन मध्ये संकलन करणे, ते इतरांना आणि समाजमाध्यमांवर पाठवणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत याची विशेष काळजी घ्यायला हवी असे मत पोलीसांनी व्यक्त केले. असे प्रकार घडत असल्यास त्याची तातडीने माहिती सायबर पोलीसांना द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी  केले आहे.