अलिबाग : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या अंगावर स्लॅबचा काही भाग कोसळून तो जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला.
सुनील आवरे असे जखमी रुग्णाचे नाव आहे. पहाटे तीनच्या सुमारास त्याच्या डोक्यावर स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. त्यामुळे तो जखमी झाला. डोक्याला जखम झाल्याने त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याच्यावर उपचार केले.
या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील अंतर रुग्ण विभागाच्या दुरावस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. रुग्णालयाच्या इमारतीला ४० वर्ष झाल्याने ती जीर्ण झाली आहे. नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले असले तरी इमारत पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोवर हीच जीर्ण आणि नादुरुस्त इमारत रुग्णांवरील उपचारासाठी वापरावी लागत आहे. त्यामुळे इमारतीला गळती लागणे, स्लॅब कोसळणे, पीओपी कोसळणे यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत.
दरम्यान या घटनेनंतर शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. पक्षाच्या वतीने जिल्हा शर्यचिकित्सकांना यावेळी घेराव घालण्यात आला.
शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था आणि रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असतानाही प्रशासनाकडून त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळण्यासारखी गंभीर घटना घडल्याने रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे यांनी केली.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी रुग्णाच्या अंगावर स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडल्याचे मान्य केले. इमारतीच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला प्रस्ताव दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
