शेतात नांगरणी दरम्यान जुने सोनं सापडले आहे, ते बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे, असे सांगून अनेकांची फसवणूक करून पसार होणाऱ्या टोळीचा रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने पर्दाफाश केला आहे. यातील तीन आरोपींनी ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरु आहे. या कारवाईत १३ लाख रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे. नागोठणे कमी किमतीत सोने देतो सांगून फसवणूक केल्या प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता. हेही वाचा >>> “मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं तेव्हा…”, अजित पवारांनी शेअर केली बाळू धानोरकरांची ‘ती’ आठवण गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला दिले होते. तांत्रिक पुराव्यांच्या विश्लेषणाचे काम सुरु असतांना पोलीस अंमलदार जितेंद्र चव्हाण यांना या गुन्ह्यातील आरोपी हे अहमदनगर आणि परांडा येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांचे एक पथक अहमदनगर तर दुसरे पथक परांडा येथे रवाना झाले. संशयित आरोपींना त्यांनी ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यात फसवणूक केलेल्या एकूण रकमेपैकी ७० टक्के रक्कम म्हणजेच १३ लाख रुपये पोलीसांनी हस्तगत केले. हेही वाचा >>> “सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…” या प्रकरणात शिवाजी विठ्ठल मोहिते, वशिकला कांतीलाल पवार, अनिता रजनकांत भोसले या तिघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे, सहाय्यक पोलीस धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक दिपक मोरे, अंमलदार जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, पोलीस नाईक अक्षय जाधव, अक्षय सावंत, मोनिका मोरे आणि सायबर सेलच्या अक्षय पाटील आणि तुषार घरत यांनी महत्वाची भुमिका बजावली. याच पध्दतीने राज्यात अन्य ठिकाणी या चौघांनी फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरु आहे.